मुख्यमंत्र्यांचा नंदूरबार दौरा रद्द ; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांना मातृशोक
स्थानिक बातम्या

मुख्यमंत्र्यांचा नंदूरबार दौरा रद्द ; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांना मातृशोक

Balvant Gaikwad

नंदुरबार | प्रतिनिधी

येथील नंदुरबार तालुका विधायक समितीच्या अध्यक्षा तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या मातोश्री विमलताई बटेसिंग रघुवंशी (८२) यांचे आज दि.१४ रोजी दुपारी धुळे येथे रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे उद्या दि. १५ रोजी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

येथील नंदुरबार तालुका विधायक समितीच्या अध्यक्षा, माजी आ.कै.बटेसिंगभैय्या रघुवंशी यांच्या पत्नी तर ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.राजेंद्र रघुवंशी, शिवसेना नेते माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, उद्योगपती तथा नंदुरबार तालुका विधायम समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या मातोश्री विमलताई बटेसिंग रघुवंशी यांचे आज दुपारी निधन झाले.

त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यामुळे त्यांच्यावर धुळे येथे उपचार सुरु होते. मात्र, आज दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. १५ रोजी सकाळी १० वाजता बाहेरपुरा येथील राहत्या घरापासून निघणार आहे.

त्यांच्यावर जी.टी.पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांनी इंदिरा महिला सहकारी बँकेच्या संस्थापक अध्यक्षा, नंदुरबार तालुका विधायक समितीच्या अध्यक्षा, इंदिरा महिला सहकारी गृहउद्योग व जीवनाश्यक वस्तु पुरवठा भांडाराच्या अध्यक्षा अशा विविध पदांवर काम केले आहे. यासह विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.

त्यांनी नगरसेविका म्हणूनही १० वर्ष काम पाहिले. त्यांना साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचा वेणुताई शंकरराव बेडसे आदर्श माता पुरस्कार मिळाला होता.

दरम्यान, उद्या दि. १५ फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पालिकेच्या स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरणाचे लोकार्पण, नगरपालिकेच्या नवीन इमारतीचे भुमिपूजन तसेच ना.ठाकरे यांचा जाहीर नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्या दि. १५ रोजी मुख्यमंत्री यांचा अधिकृत दौरादेखील जाहीर झाला होता.

सकाळी १०.४५ ला ना.ठाकरे हे नंदुरबारात दाखल होणार होते. ११ वाजता जलतरण तलावाचे लोकार्पण, ११.१५ वाजता प्रस्तावित नगरपालिका इमारतीचे भुमिपूजन व ११.३० वाजता जी.टी.पी.महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजीत करण्यात आला होता. मात्र, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या मातोश्री विमलताई रघुवंशी यांचे निधन झाल्याने हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com