Video : प. पू. वै. बस्तीरामजी सारडा ५६ वा पुण्यतिथी सोहळा; चैतन्यमहाराज देगलुरकर यांचे व्याख्यान लाईव्ह

jalgaon-digital
5 Min Read

नाशिक | प्रतिनिधी 

कोणतेही शास्त्र एकमेकांना सोडून उभे राहत नाही. सर्व शास्त्रांचा समन्वय म्हणजे संत वाड्.मय होय. परंपरेने चालत आलेल्या शास्त्रांवर पुटे चढली होती. त्या शास्त्रांकडे पाहण्याची नवी दृष्टी संत वाड्.मयाने समाजाला दिली. नवे शास्त्र निर्माण केले नाही. शास्त्राला सहज अंगीकारण्याची सवय लावून दिली. संत साहित्याचे हे समाजावर मोठे उपकार आहेत. म्हणून संत वाड्.मय कोणत्याही विचारांची गंगोत्री म्हणावी लागेल. संत वाड्.मय मानवी मर्यादांच्या पलीकडे जाऊन लिहिले गेले आहे. संत वाड्.मय अमर्याद आहे, असे विचार हभप चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले.

परमपूज्य वैकुंठवासी बस्तीरामजी सारडा यांच्या ५६ व्या पुण्यतिथी सोहळ्याला आज येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सुरुवात झाली. सोहळ्यानिमित्त ‘संत साहित्य ही आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प चैतन्यमहाराज यांनी गुंफले. व्याख्यानाच्या आरंभी वैकुंठवासी बस्तीरामजी सारडा यांच्या अर्धकृती पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अयाती सारडा हिने प्रास्ताविक आणि चैतन्यमहाराज यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

संत साहित्याचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित करताना चैतन्यमहाराज म्हणाले, संतांनी आपल्या साहित्यातून नव्याने काही दिलेले नाही. आधीचे असलेलेच नव्या रुपात व नव्या भूमिकेतून मांडले. काळानुरूप बदलणारे मन आणि जीवनशैली संतांसमोर असते. समाजमन कधीच एक राहत नाही. परिवर्तन हा जगाचा भाव आहे. परिवर्तनातही विशेष आनंद असतो. परिवर्तन नसेल तर माणूस तोच तोपणा किती दिवस सहन करेल? समाजमनाचे परिवर्तन ही नित्य प्रक्रिया आहे. संत वाड्.मयात नव्याने मांडणी नसली तरी नव्या दृष्टीने ती केली गेली आहे. बाळाला आई इतक्या सहजपणे घास भरवते की, आपण जेवत आहोत याची जाणीवही बाळाला होत नाही.

संत वाड्.मयानेही तेच काम केले आहे. जगातील सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान आपण अनुभवत आहोत हेसुद्धा माणसाला कळत नाही. एवढे कोणी करीत नाही. संत वाड्.मयाने ते काम केले आहे. विविध शास्त्रांकडे पाहण्याची दृष्टी दिली.सामाजिक जाणीव प्रगल्भतेने स्वीकारली जात नाही. सहजपणे समाजात वावरता आले पाहिजे. त्या विचारात आपण गेलो नाही. कामाच्या वाटणीची आम्हाला सवय झाली आहे. विचार आणि कृतीचे वर्गीकरण करण्याची सवय लागली. इतरांपेक्षा स्वत:ला वेगळे समजू लागलो. त्यामुळे रस्त्याने जाताना रस्त्यातील कचरा उचलला तर आपण समाजावर उपकार केल्याचा भाव निर्माण होतो.

सामाजिक जाणिवा बोथट होत गेल्या आहेत. तत्वज्ञानाचा द्वेष करायचा आहे असे आम्ही मानत असू तर तो दोष तत्वज्ञानाचा नाही; आपला आहे. तत्वज्ञानाचा अभ्यासक आहे म्हणून स्व:ला मर्यादा घालून चालणार नाही. तत्वज्ञानाला सोपे बनवण्याऐवजी कर्कश्श व कठीण बनवले गेले. संत वाड्.मयाचे आपल्या बुद्धीप्रमाणे अर्थ लावले गेले आणि जगणे अवघड करून घेतले. समाजशास्त्र, मानसशास्त्र, तर्कशास्त्र आदी विविध शास्त्रांच्या मर्यादा ज्याला कळल्या त्यालाच त्यांचा आनंद घेता येतो. मर्यादा कळल्या की आनंद घेता येतो. संत वाड्.मय मानवी मर्यादांच्या पलीकडे जाऊन लिहिले गेले आहे. संत वाड्.मय अमर्याद आहे, असे चैतन्यमहाराज यांनी नमूद केले.

संतांनी विविध ग्रंथांतील कठीण तत्वज्ञान अतिशय सोप्या आणि सुलभ शब्दांत मांडले. माऊली आणि तुकोबारायांनी ते सहजपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. ज्ञानेश्वरी मुळात सोपी आहे, पण आमच्यासारख्या कीर्तन-प्रवचनकारांनी निरुपण करताना ती अवघड केली आहे. संतांनी सर्व शास्त्रांचा समन्वय करून दिला. कुठलेही अक्षर हा एक मंत्र आहे. तसेच कोणत्याही झाडाचे मूळ कशावरचे तरी औषध असते, पण आम्हाला ते माहीत नसते. शास्त्रांचेही तसेच आहे, असे चैतन्यमहाराजांनी सांगितले.

समन्वय आणि समुच्चय
विचारातील समन्वय आणि समुच्चयाचे महत्त्व चैतन्यमहाराजांनी विषद केले. कोणतेही शास्त्र एकमेकांना सोडून उभे राहत नाही. सर्व शास्त्रांचा समन्वय म्हणजे संत वाड्.मय! माणसांच्या विचारात समन्वय असावा. समुच्चयही हवा. समांतर विचारधारा समुच्चयाकडे नेणारी हवी. रेल्वे एका रूळावर धावत नाही. दोन्ही रूळ समांतर जातात. हे रूळ समुच्चय आहेत. जिण्याने वर जाता येते. तो समन्वय आहे. एकेक पायरी टप्प्याटप्प्याने वर पोहोचवते. पहिल्या आणि शेवटच्या पायरीचा एकमेकांशी तसा संबंध नसला तरी वर पोहोचण्यासाठी त्या दोन्हींचे महत्त्व तेवढेच आहे, असे चैतन्यमहाराज म्हणाले.

मोत्यांची माळ
दोर्‍यात ओवलेल्या मोत्यांची माळ सरसकट उचलायची असेल तर त्या माळेचे एक टोक उचलून चालणार नाही. अन्यथा मोती गळून जातील. म्हणून माळेची दोन्ही टोके धरून उचलावी लागतात. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज ही दोन टोके उचलली की, समस्त संतमोती सोबत येतात, असा मौलिक विचार चैतन्यमहाराज यांनी मांडून ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचे संत साहित्यातील योगदान आणि महत्ता सांगितली.

पहिल्या पुष्पाचे संपूर्ण व्याख्यान पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *