Thursday, April 25, 2024
Homeजळगावजळगाव : करोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूदर प्रकरणी ‘डेथ ऑडीट कमेटी’ चौकशी करणार-आरोग्यमंत्री...

जळगाव : करोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूदर प्रकरणी ‘डेथ ऑडीट कमेटी’ चौकशी करणार-आरोग्यमंत्री राजेश टोपे

प्रभावी उपचारासाठी टास्क फोर्स तयार ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली माहिती
जळगाव | प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता डेथ ऑडीट कमेटी नेमून चौकशी करण्यात येणार आहे. मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईच्या पार्श्‍वभूमीवर जळगावातही टास्क फोर्स तयार करुन प्रभावी उपचारांवर भर देण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी खासगी डॉक्टरांनी टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर कायदेशीररित्या कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपी यांनी दिला आहे.

मंत्री टोपे बुधवारी जिल्हा दौर्‍यावर आले. त्यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लोकप्रतिनिधी, अधिकार्‍यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

- Advertisement -

२४ किंवा ४८ तासांत हवा अहवाल
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूची संख्या चिंताजनक आहे. परंतु, यातील संबंधित गंभीर रुग्ण जिल्हा कोविड रुग्णालयात उशिरा आले. बहुतेक जण वयस्कर असून ते अत्यवस्थ स्थितीत आले होते. त्यामुळे अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू २४ ते ४८ तासांच्या आत झालेला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांचे अहवाल येण्यास विलंब होतोय. पण, आता ते अहवाल २४ किंवा ४८ तासांच्या आत प्राप्त झालेच पाहिजे, यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. रुग्णांचे अहवाल लवकरात लवकर मिळण्यासाठी काही खासगी लॅब सेवा देत आहेत. खासगी लॅबमधील तपासणी शुल्क निश्‍चित करण्यासाठी डॉ.शिंदे यांची कमेटी काम करीत आहे. खासगी डॉक्टरांनी देखील कोविड रुग्णालयात रुग्ण सेवा करावी, असे आवाहन केले आहे.

निष्काळजीपणा केल्यास कारवाई
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रोफेसर, वैद्यकीय अधिकार्‍यांनी कामात कुचराई करता कामा नये. विनाकारण सुटी घेवून गैरहजर राहिल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. रुग्णालयामधील कामकाजावर नियंत्रण रहावे, म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील, असेही मंत्री टोपे यांनी सांगितले.

तत्काळ पदभरती
कोरोना रुग्णांवर प्रभावी उपचार व्हावे, म्हणून संबंधित रुग्णालयांमध्येे तातडीने रिक्त पदे भरण्यात येतील. कंत्राटवर काम करणार्‍या परिचारिकांना नवीन नोकर भरतीत प्राधान्य देण्यात येईल. याबाबतचे सर्व अधिकारी पालकमंत्र्यांच्या समन्वयातून जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वॉर रुम’ कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रेग्युलर डीनच्या पदासंदर्भातही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री टोपे यांनी नमूद केले.

दोन रुग्णालये अधिग्रहीत
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणखी दोन खासगी दवाखाने अधिग्रहीत करण्यात आले आहेत. यात शहरातील गोल्ड सिटी हॉस्पिटल आणि डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील १०० बेडस् राखीव ठेवण्यात आले आहेत. या दवाखान्यांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य सेवा अंतर्गत कोरोना रुग्णांवर कॅशलेसमध्ये उपचार होतील. अधिग्रहीत केलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून पैसे घेवून त्यास नाडले जात असेल आणि यासंदर्भात कोणी तक्रार दिल्यास व त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या