जळगाव : कोरोना पॉझिटीव्हच्या संपर्कातील २० संशयित तपासणीसाठी रूग्णालयात
स्थानिक बातम्या

जळगाव : कोरोना पॉझिटीव्हच्या संपर्कातील २० संशयित तपासणीसाठी रूग्णालयात

Rajendra Patil

जळगाव | प्रतिनिधी

शहरातील मेहरुण परिसरातील रहिवासी कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करणार्‍या त्याच्या मित्रासह घरातील व संपर्कातील सुमारे २० जणांना संशयित रुग्ण उपचार आणि सुरक्षेच्या दृष्टीने शाहूनगरातील महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील या अगोदरच्या तिघं संशयित रुग्णांनाही छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मेहरुणमधील ४९ वर्षीय पॉझिटीव्ह रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तो दुसर्‍या स्टेपमधील म्हणजे मध्यम स्वरुपातील रुग्ण आहे. तो १४ मार्च रोजी मुंबईला गेला होता. त्यानंतर तो १७ मार्च रोजी जळगावात परतला. तो मुंबईत असतानाच त्याला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याने मुंबई व घरी परतल्यानंतर जळगावातही खासगी दवाखान्यात प्रथमोपचार केला.

तो या कालावधीत त्याच्या कुटुंबातील १८ जण व मित्रासह अन्य एका जणांच्या संपर्कात आला. त्याला जिल्हा रुग्णालयात त्याच्या मित्राने दाखल केले आहे. त्या मित्रालाही एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेवून त्यास संशयित म्हणून छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात दाखल केले.

मेहरुण परिसरात अनावश्यक कोणी फिरू नये, याबाबत खबरदारी घेत आहोत. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी माहिती दिली.

मनपाच्या रुग्णालयात २३ संशयितांवर उपचार
या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व संशयितांच्या लाळीचे नमुने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतले असून ते तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येतील. या संशयितांच्या संपर्कात कोणी येणार नाही, याबाबत खबरदारी घेतली जात आहे. तसेच पॉझिटीव्हच्या संपर्कातील २० संशयित आणि जिल्हा रुग्णालयातील या अगोदरच्या तिघं संशयितांवर देखील छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com