Blog : गजबजतील पुन्हा शहर की, लिहिला जाईल पुन्हा इतिहास

Blog : गजबजतील पुन्हा शहर की, लिहिला जाईल पुन्हा इतिहास

इतिहास

सुनसान रस्ते, ओस पडलेली गावे, बंद दुकाने , मोकळ्या बाजारपेठा , शाळा बंद , मैदाने भकास , घाबरी घुबरी होऊन घरात दडून बसलेली माणसे , सरकारने बंदी चा आदेश दिलाय , पण त्याचीही गरज नाही आपापल्या जिवाच्या काळजीने कुणीही बाहेर पडायचा विचारही करत नाहीये .का? कोणता मोठा दहशतवादी हल्ला झालाय देशावर?

की धार्मिक दंगली उसळल्यात शहरात? अण्वस्त्र हल्ला तर नाही ना होणार आहे ? की काही नैसर्गिक आपत्ती येणार आहे ? की महायुद्ध छेडलं गेलंय?

आणि कुठे कुठे ?
भारतात? अमेरिकेत? चायना मध्ये? जपानमध्ये? इराण इराक, इटली, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिका की, मग पाकिस्तान, श्रीलंका, भूतान की नेपाळ ?

मग दुसरीकडे पळून जाऊया कुठे तरी. पण हे काय पळून जाण्याच्या सगळ्याच वाटा बंद झाल्यात, परतीचे दोर केव्हाच कापले गेलेत. सगळ्या जगात हाहाकार माजलाय. आज परमेश्वराने पण दार बंद करून घेतलीत. मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा सगळंच तर बंद आहे. बरं एकत्र येऊन एकमेकाला आधार देऊया , छे ! ते केवळ अशक्य…

कुणी आणलीय ही परिस्थिती ? काय
फक्त एक विषाणू ?
जो उघडया डोळ्यांनी दिसत ही नाही,

एरवी परमेश्वराला सुद्धा न घाबरणाऱ्या माणसाला या यतकच्छीत जिवाने त्राहिमाम करून सोडलंय, मोठमोठया दहशतवादी हल्ल्यानंतरही काही तासात पुन्हा उभं राहणाऱ्या शहरांना पुरत झोपवलंय, पूर , भूकंप, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीतही जिद्दीने तोंड देणाऱ्या मानव जातीच पुरत कंबरडे मोडलंय.

अगदी खरं बोलायचं तर , गर्वाने ,अहंकाराने फुगलेल्या माणसाचा पुरता माज उतरवलाय या विषाणू ने. आणि दुर्दैव म्हणजे, ही तर फक्त झलक आहे. अजूनही यावरून माणसाने धडा घेतला नाही तर, भविष्यात काय भयंकर घडेल याचा काहीच भरोसा नाही.

हजारो वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीतलावर अनेक संपन्न अशा संस्कृती नांदत होत्या . कालांतराने त्या लोप पावल्या . काही पूर ,भूकंप , दुष्काळ, महामारी अशा नैसर्गिक आपत्तीने नाश पावल्या ,तर काही युद्धा सारख्या मानवनिर्मित संकटाने संपल्या . आजपर्यंत हा इतिहास आपण रंगवून रंगवून शिकवला पण आपल्याच हयातीत अशी वेळ येईल अस कधीच वाटलं नव्हतं . इतर आपत्ती प्रमाणे या आपत्तीवर सुद्धा काही दिवसात माणूस मात करेल पण त्याला किती दिवस लागतील आणि तोपर्यंत हा विषाणू किती बळी घेईल हे कुणीच सांगू शकत नाही. इटली सारख्या समृद्ध ऐतिहासिक वारसा असलेल्या देशाची आज काय अवस्था झालीय ते पाहुन पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही.

मुंबई , पुणे ,दिल्ली , न्यूयॉर्क , लंडन , रोम , पॅरिस या कधीही विश्रांती न घेणाऱ्या शहरांमधील सुनसान रस्ते पाहिले की , इतिहासकाळात काळाच्या पोटात गडप झालेल्या त्या संपन्न शहरांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

गेल्या शतकात झालेली दोन महायुद्धे आपल्या आधीच्या पिढीने पहिलीत , पण त्याची सुद्धा भयानकता काही देशां पुरती मर्यादित होती आणि मुख्य म्हणजे ते युद्ध थांबवणं माणसाच्या हातात होत , पण आज …

आज मात्र काहीच माणसाच्या हातात नाही. एक छोटीशी चूक आणि सगळं उद्धवस्त …खरंच या विषाणूं ने माणसाला माणसाची औकात दाखवली . पंछी , नदीया, पवन के झौके कोई सरहद ना इन्हे रोखे ,हाच न्याय या विषाणू ला ही लागू झालाय, त्याला देश , राज्य , गाव ,शहर , जाती , पंथ , धर्म यांच्या सरहद्दी मान्य नाहीत . त्याच्या वाटेत जो येईल त्याला तो गिळंकृत करत सुटलाय, जागतिकीकरण हे एकविसाव्या शतकातल्या प्रगतीच फलित , तेच आज मानवासाठी शाप ठरू लागलंय.

जेव्हा सर्वप्रथम चीन मध्ये या विषाणूचा प्रकोप झाला , तेव्हाही आपल्याला वाटत होत , आपल्याकडे असा काही आजार येणं , केवळ अशक्य ! पण अगदी काहीच दिवसात त्याने आपल्या देशात प्रवेश केला , हळू हळू आपल्या राज्यात , शहरात , आपल्या गावात , शेजारी आणि आता पुढे काय ?

घरात?
नुसत्या विचारानेच धडकी भरलीय यातून सावरण्याची संधी मिळेल माणसाला ? करता येईल या आजारावर मात?
गजबजतील पुन्हा शहर? भेटेल पुन्हा माणसाला माणूस उराउरी? की पुन्हा लिहिला जाईल इतिहास?
काळाच्या उदरात गडप झालेल्या आणखी एका संपन्न संस्कृतीचा?

  • परमेश्वर सगळ्यांना या आपत्तीशी लढण्याची शक्ती देवो।

तनुजा सुरेश मुळे ( मानकर )

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com