Blog : मराठी राजभाषा दिन विशेष : माझ्या मराठीची बोलु कौतुकें…!
स्थानिक बातम्या

Blog : मराठी राजभाषा दिन विशेष : माझ्या मराठीची बोलु कौतुकें…!

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मराठी भाषा दिवस हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

मानवाचा जसा जसा विकास घडत गेला तस तशी भाषा सुद्धा विकास पावत गेली. भाषेची अनेकविध स्थित्यंतरे घडत गेली. अगदी गर्भावस्थेपासून मुलाच्या कानावर जे ध्वनी पडतात ते भाषेच्या माध्यमातून. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन. सुरुवातीला मौखिक असणारी भाषा सांकेतिक ध्वनीचिन्हाच्या रूपात अक्षय म्हणजे अक्षर लिपीमध्ये बद्ध झाली.

मूल जन्माला आल्यापासून सतत कानावर पडणारी भाषा मूल आपोआप आत्मसात करते आणि मग तिच त्याची मातृभाषा ठरते. अन प्रत्येकाला आपली मातृभाषा मातेसारखीच असते. भाषेतून समाजाची जडणघडण दिसते, प्रगतीची अवस्था स्पष्ट होतात.

संत ज्ञानेश्‍वरांपासून ते शिवकालीन संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, श्रीसमर्थ रामदासस्वामी, श्रीदासोपंत इत्यादी अगदी श्रीगोंदेकर सगळ्या संतांनी आपली ही मराठी भाषा सुंदर ठेवली आणि साजरीगोजरी बनवली. भजनदिंड्या आणि कीर्तने यांतून मराठी भाषा अधिक फुलली. संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकोबांचे अभंग, गवळणी, भारूड आणि ओव्या-उखाणे, जोत्यावरच्या झोपाळ्यावर आणि माजघरातील जात्यावर गायिल्या जात.

शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी देखील याचे महत्त्व जाणून मराठी भाषेलाच राजकीय भाषेचा दर्जा दिला. अगदी याच काळापासून मराठी भाषा जागातील इतर लोकांना देखील समजली आणि मराठी संस्कृतीचा खऱ्या अर्थाने उदय झाला, असे म्हटल्यास कमीपणाचे ठरणार नाही.

९ व्या शतकाच्या उत्तरार्धात निबंधकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपले नियतकालिक सुरु केले. ज्योतिबा फुले आणि गोपाळ हरी देशमुख यांनी “दिनबंधू” आणि “प्रभाकर” नियतकालिकांची सुरुवात केली. २०व्या शतकात मराठी भाषेने पुढचा टप्पा गाठला.

ज्याप्रमाणे प्रत्येक राज्याची श्रीमंती त्या राज्याचा अर्थव्यवस्थेवरून केली जाते, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक भाषेची श्रीमंती ही त्या भाषेतील साहित्याच्या श्रीमंतीवरून करण्यात येते. सुदैवाने आजपर्यंत मराठी भाषेला लेखकांची, कवींची उणीव कधीच भासली नाही. अगदी संत वाङ्मयापासून ते आजच्या कथा, पटकथांपर्यंत अनेक साहित्य रचना या भाषेत झालेल्या आहेत.

गद्य, पद्य, नाटक अशा तिनही क्षेत्रात मराठी भाषेतील साहित्य रचना उत्कृष्ट दर्जाची असून आजही ती लोकांना अगदी प्रसन्न अशीच भासते. मराठी चित्रपटांनी सुद्धा यात भरच घातली आहे. अनेक उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट मराठी भाषेत प्रदर्शित झालेले आहेत, होतातही आहेत. या चित्रपटांमुळेच आज मराठी भाषेचा झेंडा सातासमुद्रापार जाउन तिचे महत्त्व दशपटीने वाढलेले आहे.

असं म्हणतात की, “तांदूळ नीट निवडलेले नसले, तर जेवतांना खडा लागतो आणि जेवणातला आनंद न्यून होतो. त्याप्रमाणे लिखाणात किंवा बोलण्यात इतर भाषांतील शब्द आल्यास त्यातील आनंद न्यून होतो.’

शेवटी इतकेच…
मराठी भाषेच्या कौतुका संबंधी प्रकर्षाने आठवता त्या कविवर्य सुरेश भटांच्या ओळी..

“लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी ”

  • शमीका खुशाल कारिया, लेखिका ब्लॉगर आहेत
Deshdoot
www.deshdoot.com