नाशिक स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे गिते बिनविरोध?
स्थानिक बातम्या

नाशिक स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे गिते बिनविरोध?

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखाली महापालिका नगरसचिव विभागाकडुन सुरु असलेल्या स्थायी सभापती पदाची निवड प्रक्रियेत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडुन गणेश गिते यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे.

यामुळे गिते यांची निवड बिनविरोध झाली असली तरी न्यायालयीन प्रक्रियेनुसार ती अधिकृत नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार उद्या (दि.6) होणारी सभापतीसाठी निवडणुक प्रक्रिया व गुप्त मतदानाची प्रक्रिया पुर्ण होऊन बंद लखोट्यात मतपत्रिका न्यायालयात सादर केल्या जाणार आहेत. दरम्यान या निवडणूक प्रक्रियेवर शिवसेनेकडुन बहिष्कार टाकण्यात आला आला आहे. अर्ज घेऊन जाणारे मनसेनेचे मुर्तडक, राकाँच्या मेमन यांनी अर्ज दाखल केला नाही.

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडुन महापालिकेतील तौलानिक बळासंदर्भात पाठविण्यात आलेल्या पत्रांची दखल घेत महापालिका नगरसचिव विभागाने स्थगित केलेली स्थायी सभापती निवडणूक पुन्हा घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. यानुसार विभागीय आयुक्तांच्या अधिपत्याखाली सभापतीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून आज अर्ज दाखल करण्याच्या दुपारी 1 वाजेपर्यतच्या अखेरच्या मुदतीत भाजपचे गणेश गिते यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे.

तर दोन दिवसापुर्वी अर्ज नेलेले मनसेनेचे नगरसेवक तथा माजी महापौर अशोक मुर्तडक व राकाँच्या समिना मेमन यांनी आज अर्ज दाखल केला नाही. त्याचबरोबर शिवसेनेकडुन सुधाकर बडगुजर व सत्यभामा गाडेकर यांनी अर्ज नेण्यात आल्यानंतर त्यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले नाही. तसेच आज अर्ज घेऊन दाखल करण्यास कॉग्रेसला संधी मिळाली नाही.

साडेबारा वाजेच्या सुमारास सभापतीच्या निवडणूक प्रक्रियेत भाजपचे गिते यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. महापौर सतिश कुलकणीर्र्, उपमहापौर भिकुबाई बागुल, सभागृह नेते सतिश सोनवणे, भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे, भाजप गटनेते जगदिश पाटील यांच्यासह नगरेसवक व पदाधिकारी यांच्या उपस्थित गिते यांचा अर्ज नगरसचिव राजु कुटे यांच्याकडे दाखल करण्यात आला. गिते यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

न्यायालयाच्या निर्देशानुसार सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया होत असल्याने उद्या सकाळी अकरा वाजता ही प्रक्रिया स्थायी सभापती कार्यालयातील सभागृहात होणार आहे. जिल्हाधिकारी तथा पिठासन अधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या निवडणूक प्रक्रियेत प्रथम अर्जाची छाननी होणार असून नंतर मतदानाची प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे.

ही प्रक्रिया झाल्यानंतर हा निकाल जाहीर जाहीर न करता, या प्रकियेचे कागदपत्र सिलबंद पाकीटात न्यायालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

निकालासंदर्भातील निर्णय न्यायालयाकडे राखीव राहणार आहे. दरम्यान आज स्थायी समिती कार्यालयात निवडणुक घेण्यासाठी करावी लागणारी सर्व तयारी नगरसचिव विभागाकडुन करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com