तत्कालीन प्रांत ,तहसीलदारांना सात लाखांचा दंड

शासकीय धान्य गोदामात 336 क्विंटलची तफावत आढळून आल्याप्रकरणी दाखल तक्रारीनुसार तत्कालीन एक प्रांत अधिकारी व तीन तहसीलदारांसह सात जणांकडून 7 लाख 27 हजार 244 रूपये 17 पैशांंची रक्कम वसुल करण्याचे आदेश नुकतेच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल 2019 मध्ये तात्कालीन तहसीलदार महेंद्र पवार यांनी येथील शासकीय धान्य गोदाम क्र.1, 2, 3 ची तपासणी करू धान्याच्या ताफवातीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला होता. या अहवालात 913.90 क्विंटल गहू, तांदूळ 89.24 क्विं, साखर 04.11 क्विं., उडीत दाळ 0.26 क्विं., ज्वारी 23.27 क्विं. असे एकूण 1033.90 क्विंटल एवढा धान्याचा साठा कमी प्रमाणात आढळून आलेला असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच समोर सादर केला.

सदरील अहवालात आर लेखे अनुसार दि.31 मार्च 2019 चा शिल्लक धान्य साठा गृहीत धरण्यात आला. याबाबत तात्कालीन गोदाम पाल आर.एल.राठोड यांना नोटीस देण्यात आली होती. त्यांच्या लेखी खुलाश्याप्रमाणे चोरवड, ता.भुसावळ येथील गोदामात ठेवलेल्या अन्नधान्य साठ्याबाबत तहसीलदारमार्फत तपासणी करण्यात आली.

तात्कालीन तहसिलदार यांनी दि.30 ऑक्टोबर 2019 रोजी तपासणी अहवाल सादर करून चोरवड येथील खासगी गोदामात तपासणीच्या वेळी 339.61 क्विंटल गहू आढळून आल्याचे अहवालात नमूद केले आहे. यानंतर तात्काळ उचित कारवाही होणे आवश्यक असतांना प्रस्तुत प्रकरण जाणिवपूर्वक दाबून ठेवण्यात आले होते. याबाबत चौकशी करण्याची मागणी येथील दिनेश उपाध्याय यांनी केली होती.

त्यानंतर नागरि पुरवठा विभागाचे सहाय्यक संचालक प्रदीप केदार यांनी चौकशी केली होती. त्यानुसारच्या अहवालानुसार जिल्हाधिकारी यांनी नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार तत्कालीन प्रांत अधिकारी श्रीकुमार चिंचकर, तत्कालीन तहसीलदार विशाल नाईकवाडे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तहसीलदार आर.एल. राठोड (बोदवड), गोदाम व्यवस्थापक आर.एल राठोड यांच्याकडून संबंधित धान्यापोटी 7 लाख 27 हजार 244 रूपये 17 पैशांची रक्कम समप्रमाणात 15 दिवसात वसुल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिले आहे. या निकालाविरुद्ध संबंधित प्राधिकरणाकडे संबंधितांना अपिल करता येणार असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com