विजेच्या धक्क्याने दोघं भावांचा भुसावळात मृत्यू
स्थानिक बातम्या

विजेच्या धक्क्याने दोघं भावांचा भुसावळात मृत्यू

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

भुसावळ  – 

येथील जामनेर रोडवरील दीनदयालनगरात असलेल्या कारंजातील पाण्यात खेळण्यासाठी हात टाकताच दोन सख्ख्या भावांना विजेचा धक्का बसला. त्यात एका भावाचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्‍याचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 8.30 वाजेदरम्यान घडली.

येथील जामनेर रोडवरील दीनदयालनगरासमोर असलेल्या तिरुपती पेट्रोल पंपाच्या प्रवेशद्वाराजवळ पाण्याचा कारंजा व बसायचे बेंच लावण्यात आलेले आहे.

इंदिरानगरमध्ये हातमजुरी करणार्‍या वडिलांसोबत गणेश शंकर राखुंडे (वय 11) व दीपक शंकर राखुंडे (वय 13) राहतात. ते दोन्ही भाऊ रात्री 8.10 वाजेच्या सुमारास खेळण्यास गेले होते.

त्यांनी प्रवेश द्वाराजवळ असलेल्या पाण्याच्या कारंजातील पाण्यात हात टाकला. पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने दोघांना विजेचा धक्का बसला. त्यात गणेशचा जागीच मृत्यू झाला तर दीपकला उपचारार्थ गोदावरी हॉस्पिटल येथे हलविण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

राखुंडे कुटुंबीय धुळ्याचे होते. दोन महिन्यांपूर्वीच भुसावळ येथे ते आले होते. या घटनेमुळे पेट्रोल पंपासह जामनेर रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांची एकच गर्दी जमा झाली होती.

त्यामुळे काहीकाळ वाहतुकीचादेखील खोळंबा झाला होता. घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com