सत्तेसाठी शिवसेनेनं सगळी तत्वं गुंडाळून मातोश्रीच्या एका कोपऱ्यात ठेवली; भारतीय जनता पक्ष सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार
स्थानिक बातम्या

सत्तेसाठी शिवसेनेनं सगळी तत्वं गुंडाळून मातोश्रीच्या एका कोपऱ्यात ठेवली; भारतीय जनता पक्ष सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

मुंबई :

शिवसेनेने सत्तेसाठी आपली सर्व तत्व गुंडाळून मातोश्री बंगल्याच्या एका कोपऱ्यात ठेवली आहेत, आणि हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेची घोर फसवणूक करत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल, असा निर्धार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. नवी मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश राज्य परिषदेला श्री पाटील संबोधित करत होते.

यावेळी भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डाजी, प्रदेश प्रभारी सरोज पांडे, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतिशजी, प्रदेश संघटक विजयराव पुराणिक, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पियुष गोयल, भारतीय जनता पक्षाचे नेते विनयजी सहस्रबुद्धे, पंकजाताई मुंडे, एकनाथ खडसे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजप नेते उदयनराजे भोसले, नारायण राणे, आमदार गणेश नाईक, मंदाताई म्हात्रे यांच्यासह प्रदेश कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी आता राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला सत्ता स्थापनेसाठी आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनण्यासाठी स्पष्ट जनादेश दिला होता. मात्र, मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी या जनादेशाचा अनादर शिवसेनेने केला. सत्तेसाठी शिवसेने हिंदुत्वाच्या तत्वाला मूठमाती दिली. सत्तालालसे पायी महापुरुषांचा अपमानही शिवसेना आज सहन करत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निर्बत्सना काॅंग्रेस सातत्याने करत आहे. पण त्यावर शिवसेना बोलत नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना मध्य प्रदेशमधील काॅंग्रेस सरकार करत आहे. पण त्यावरही शिवसेना नेते बोलायला तयार नाही. सत्तेसाठी शिवसेनेने आपली सर्व तत्वं गुंडाळून मातोश्री बंगल्याच्या कोपऱ्यात ठेवली आहेत.”

श्री पाटील पुढे म्हणाले की, “महाजनादेशाचा अपमान करुन सत्तेत आलेलं महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची घोर फसवणूक करत आहे. शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचा शब्द या सरकारने दिला होता. पण तो शब्द पाळला नाही. आज राज्यात महिला असुरक्षित आहेत. राजरोसपणे महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या काळात गुन्हेगारांना शिक्षेचा कनव्हिकशन रेट अतिशय उत्तम होता. त्यामुळे प्रत्येकाला कायद्याचा धाक होता. पण आज राज्यात कुणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही.”

ते पुढे म्हणाले की, “आज राज्यातील जनतेची ज्या प्रकारे फसवणूक सुरु आहे, त्यामुळे आता सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करणार आहे. भारतीय जनता पक्ष राज्यात सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल. यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल.”

श्री. पाटील पुढे म्हणाले की, “आगामी नवी मुंबई महानगरपालिका आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांसह सर्व विरोधक एकत्र येतील. या तिघांविरोधात भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढेल, आणि दोन्ही मनपा मध्ये भारतीय जनता पक्ष विजयी होईल, आणि आपला महापौरच विराजमान होईल.” असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

Deshdoot
www.deshdoot.com