महावितरणच्या अभियंत्यास मारहाण; हॉटेलची विज कापल्याचा रागातून दोघांचे कृत्य

महावितरणच्या अभियंत्यास मारहाण; हॉटेलची विज कापल्याचा रागातून दोघांचे कृत्य

नाशिक । प्रतिनिधी

भद्रकाली परिसरातील एका हॉटेलचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या रागातून हॉटेल चाकल दोघा युवकांनी दोघांनी महावितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यास शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना भद्रकाली महावितरण कंपनीच्या शहर उपविभाग कार्यालयात झाली.
सर्फराज गफूर कोकणी (रा. फाळके रोड, भद्रकाली) हा त्याचा जोडीदार आयुब पठाण अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान संशयितांनी भद्रकाली पोलीस ठाण्यातही अभियंत्यास शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार महावितरण कंपनीच्या वतीने वीज बील न भरल्यामुळे ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येत असून बुधवारी (दि.11) सकाळी भद्रकालीतील बादशाह तंदुर या हॉटेलचे 14 हजार 360 रुपये वीज बील थकल्याने हॉटेलचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे दुकान मालक सर्फराज गफूर कोकणी व त्याचा जोडीदार आयुब पठाण हे दोघे बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास भद्रकाली येथील वीज मंडळाच्या उपविभागीय कार्यालयात आले.

त्यांनी वीज पुरवठा का खंडीत केला अशी कुरापत काढून कार्यालयात शिवीगाळ केली. त्यामुळे कार्यालयातील कर्मचार्‍यांनी दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी मिळून सहायक अभियंता शशांक बाळासाहेब पेंढारकर यांना मारहाण केली. त्यानंतर पेंढारकर हे त्यांच्या सहकार्‍यांसोबत भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले असता तेथेही दोघा संशयितांनी येऊन शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com