खरीप हंगामात शेतक-यांना पीककर्ज मिळण्याची बँकांनी दक्षता घ्यावी – कृषिमंत्री भुसे
स्थानिक बातम्या

खरीप हंगामात शेतक-यांना पीककर्ज मिळण्याची बँकांनी दक्षता घ्यावी – कृषिमंत्री भुसे

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मुंबई |  कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा होत आहे. त्यामुळे बँकांनी येत्या खरिप हंगामासाठी शेतक-यांना मोठ्या प्रमाणावर अर्थ सहाय्य करावे, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.

कृषी क्षेत्रात कर्जपुरवठा अधिक होण्यासाठी कृषिमंत्र्यांनी बँकांच्या प्रतिनिधींची मंत्रालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, राज्य बँकर्स समितीचे एन. एस. देशपांडे, नाबार्डचे आर.बी.डिसूझा, योगेश गोखले, एसबीआयचे रिजनल मॅनेजर संतोष मोहपात्रा, एमएससीबीचे एस.बी.जाधव, व्ही.डी.जोशी, आयसीआयसीआय बँकेचे समीर कुलकर्णी, कृषी विभागाचे उपसचिव पी.डी.सिकंदर तसेच आयसीआयसीआय, नाबार्ड, स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, एमएससीबी आदी बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. भुसे म्हणाले की, बँकांनी लहान शेतक-यांना केंद्रस्थानी ठेवून कर्जपुरवठा करावा. जास्तीत जास्त शेतक-यांना वित्तपुरवठा करून त्यांना आपल्या पायावर उभे करण्याकरिता प्रयत्न करावेत. कृषी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक योजना शेतक-यांपर्यंत पोहोचते का, निकषाप्रमाणे त्यांनी रक्कम भरली का याचा आढावा संबंधित बँकांनी घ्यावा. तसेच पात्र शेतक-यांना पीक कर्जापासून वंचित ठेवू नये, असेही त्यानी यावेळी सांगीतले. कृषी योजनाच्या बाबतीत धोरणात्मक बाबींसाठी सहकार मंत्री यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असेही श्री. भुसे यानी सांगितले.

कृषी क्षेत्रात पतपुरवठा वाढविण्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन बँकांच्या प्रतिनिधींनी यावेळी दिले. अल्प, अत्यल्प, व बहुभूधारक शेतक-यांसाठी पीककर्ज व मध्यममुदत कर्ज वितरण, कर्जमाफी झालेल्या शेतक-यांसाठी नवीन कर्ज देणे, कृषी क्षेत्रातील भांडवरील गुंतवणूक करणे आदी विषयांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com