विशेष मुलांनी उघडली मनाची कवाडे!; जागतिक स्वमग्नता दिवसाच्या निमित्ताने..
स्थानिक बातम्या

विशेष मुलांनी उघडली मनाची कवाडे!; जागतिक स्वमग्नता दिवसाच्या निमित्ताने..

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

वैशाली शहाणे (सोनार) | 
नाशिक- देश बंदच्याच नव्हे तर कोणत्याही परिस्थितीत आनंदी कसे रहावे हे आमच्या या विशेष मुलांनी आम्हाला शिकवले आहे.
देश व शाळा बंदच्या या काळात सतत त्यांच्या सहवासात राहताना पालकांच्या मनाची आणि त्यांच्यापासून दूर राहताना आम्हा शिक्षकांच्या मनाची दारे त्यांनी आपल्या आनंदी वर्तणुकीने सताड उघडली आहेत असे डेव्हलपमेंटल बालरोगतज्ञ डॉ. उमा बच्छाव यांनी सांगितले. 
मुलांनी खूप सहज कोडे सोडवले…  
देश बंद झाला आणि आमची विशेष मुलांची शाळा आणि उपचार (थेरेपी) बंद झाले. एरवी मुले काही तास शाळेत आणि काही तास घरी असतात. शाळेचे वेळापत्रक असते. त्यांची व आम्हा सगळ्यांची घडी बसलेली असते. शाळा बंद झाल्यामुळे ही घडी विस्कटणार होती. मुले सतत घरीच असणार होती.
शाळा आणि उपचारांशिवाय या मुलांचे कसे होईल? या प्रश्नाने आम्हाला सगळ्यांना चांगलेच सतावले होते. पण या मुलांनी आम्हाला सगळ्यांना पडलेले हे कोडे इतके सहज सोडवले की थक्कच झालो. मुलांनी स्वतःला आपापल्या घरात सहज सामावून घेतले आहे. मुले पालकांना घरातील कामात मदत करत आहेत. काही जण अभ्यास करत आहेत. रस्ते बंद आहेत. घराबाहेर जायला मिळत नाही म्हणून काही जणांची थोडी कुरकुर सुरु होती. पण पालकांनी त्यांना बातम्या दाखवल्या. पोलीस बंदोबस्त दाखवला. रस्त्यावर फिरायला बंदी आहे हे मुलांनी समजावून घेतले आणि पालकांना त्रास न देता स्वतःला घरात सामावून टाकले. हा बदल त्यांच्यात खूप सहज झाला.
सतत चिंता का करायची?
विशेष मुलांच्या पालकांना आणि त्यांच्या शिक्षकांना सतत या मुलांची काळजी असते. मनाच्या एका कोपऱ्यात चिंता असते. काही मूले अती चंचल असतात. अशा स्वमग्न व विशेष मुलांना सतत कोणत्यातरी गोष्टीत गुंतवून ठेवावे लागते असे आतापर्यंत आम्हाला सर्वाना वाटत होते.
बंद च्या या काळात घरी मुलाना कशात गुंतवून ठेवायचे हे पालकांना कळत नव्हते. पण या मुलांना सतत कशात तरी गुंतवून ठेवायला पाहिजे हा आमचा गैरसमज आहे हे मुलांमुळे आम्हाला कळले. सुट्टीच्या या काळात मुले घरात रमली आहेत.  मुलांचे आई बाबाही घरी आहेत. बाबा सतत बरोबर असल्यामुळे मुले खुश आहेत.
त्यांच्याबरोबर मस्ती करत आहेत.  आपल्या मुलांसाठी आपणही काही करू शकतो, करायला हवे हे पालक विसरले होते. घराला, स्वतःला आणि मुलांना उत्तम वेळ द्यावा लागतो. ऍक्टिव्हिटीचा चाबूक घेऊन त्यांच्या मागे लागायची गरज नाही हे पालकाना उमगले आहे. विशेष मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला आहे. शिक्षक म्हणून आम्हीही तेच शिकलो आहोत. ही आमची फार मोठी उपलब्धी आहे.
मुले खूप आनंदी आहेत.. 
देश काही काळापुरता बंद झाला आहे. पण स्वमग्न मुले कायमच त्यांच्या जगात बंदिस्त असतात. बाहेरच्या जगात काय चालले याच्याशी त्यांना काही देणेघेणे नसते. ते त्यांच्या जगात आनंदी असतात. कोणत्याही परिस्थितीत आनंदी कसे राहावे हे मुलांनी आम्हाला शिकवले आहे. त्यामुळेच मुले, पालक व शिक्षक तणावरहित आहेत.
पोलीस काका जय हिंद… 
दर्शन हा १७ वर्षांचा विद्यार्थी पेठ रोडला राहतो. त्याने रोज सकाळी दूध आणायचे काम स्वतःहून स्वीकारले आहे. दुधाचे दुकान घरापासून एक-दीड किलोमीटर दूर आहे.  चेहऱ्याला मास्क बांधून जातो. सुरुवातीला पोलिसानी त्याला अडवले. प्रश्न विचारले. पण आता ते त्याला अडवत नाहीत. मदत करतात. हा कुठेही भटकत नाही हे त्यांना माहिती झाले आहे. तो रोज जातो. पोलीस काकांना ‘जय हिंद’ म्हणतो आणि दूध घेऊन घरी परत जातो.
Deshdoot
www.deshdoot.com