रावेर येथे दंगल : २ गंभीर जखमी

jalgaon-digital
2 Min Read

रावेर – 

कोरोनाचा सामना करण्यासाठी देशभरात एकीकडे सर्वत्र ‘जनता कर्फ्यू’ लागू असताना रावेरात मात्र रात्री 8.30 वाजेच्या सुमारास तुफान दगडफेक करण्यात आली. 144 कलम लागू असतानाही झालेली ही दगडफेक व जाळपोळ आत्मपरीक्षण करायला लावणारी असून रावेरमधील वातावरण तणावपूर्ण होते. या दंगलीत एक जण ठार झाला असून दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे.

रावेर शहरातील मण्यारवाडा प्रार्थनास्थळाजवळ ‘जनता कर्फ्यू’ची वेळ संपण्याच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार मण्यारवाड्यातून शिवाजी चौकाजवळ दगडफेक करण्यात येत असताना दुसर्‍या बाजुनेही प्रतिकार म्हणून दगडफेक करण्यात आली. या दंगलीचे लोण शहरातील संभाजी चौकात पोहोचताच या ठिकाणीही जाळपोळ करण्यात आली. जमावाने पोलिसांवरदेखील दगडफेक केली. त्यामुळे बचावासाठी पोलिसांनी तीन राऊंड हवेत गोळीबार केला.

दरम्यान वातावरण आटोक्यात आणण्यासाठी रावेर पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केला. परंतु, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच जळगावहून कुमक मागविण्यात आली.
दरम्यान, जळगावपासून मुक्ताईनगरपर्यंतच्या पोलिसांना रावेरकडे पाचारण करावे लागले. त्याचसोबत प्रांताधिकारी, तहसीलदार रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावर थांबून होते. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या दंगलीत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या दगडफेकीत काही जण जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोरोनाला धक्का देण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यू’त जळगाव जिल्हादेखील सहभागी होता. रावेर शहरातदेखील याची सायंकाळपर्यंत नागरिकांनी अंमलबजावणी केली. मात्र रात्री 8.30 वाजता अचानक मुख्य चौकात तुफान दगडफेक करण्यात आली. रावेर शहरातील दंगलीची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी यावल, मुक्ताईनगर, निंभोरा, अडावद, भुसावळ तसेच जळगाव येथील राखीव पोलिसांना रावेरकडे पाचारण करण्यास सांगितले व त्यांनी स्वत:देखील वरिष्ठ अधिकार्‍यांसह रावेर गाठले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *