Thursday, April 25, 2024
Homeजळगावजळगाव जिल्हा रुग्णालयात आणखी एक कोरोना संशयित रुग्ण दाखल

जळगाव जिल्हा रुग्णालयात आणखी एक कोरोना संशयित रुग्ण दाखल

जळगाव – 

जिल्हा रुग्णालयात आणखी एक कोरोना संशयित 22 वर्षीय तरुण रुग्ण मंगळवारी दुपारी दाखल झाला. हा संशयित रुग्ण शहरातीलच मूळ रहिवासी असून तो स्पेनमध्ये शिक्षण घेत आहे. तो स्पेनमधून चार दिवसांपूर्वी घरी परतला. त्याला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. हा विद्यार्थी विदेशातून परतल्यामुळे त्याच्यासंदर्भात वैद्यकीय सूत्र अधिक काळजी घेत आहे.

- Advertisement -

या विद्यार्थ्याच्या लाळीचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पुण्याला रवाना करण्यात आले. या अगोदर जिल्हा रुग्णालयात सोमवारी दोन संशयित रुग्ण दाखल झाले असून त्यांच्याही लाळीचे नुमने पुण्याला पाठवण्यात आले आहे. तर रविवारी तालुक्यातील एक ज्येष्ठ नागरिकाने वैष्णव देवी यात्रेवरुन परतल्यानंतर कोरोनासंदर्भात तपासणी करुन घेतली.

परंतु, त्याने लाळीचे नमुने घेवू देण्यास डॉक्टरांना नकार दिला. त्यानंतर जळगावातील मूळ रहिवासी व मुंबईत आयटी क्षेत्रात काम करणार्या तरुणीची तपासणी जिल्हा रुग्णालयात झालेली आहे. तिच्याही लाळीचेे नमुने घेवून ते पुण्याला पाठवण्यात आले आहे. या तरुणीच्या मुंबईतील कार्यालयाच्या इमारतीमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. ही तरुणी जळगावात परतल्यानंतर तिनेही रविवारी जिल्हा रुग्णालयात तपासणी करुन घेतली.

तिघांवर उपचार सुरू

केरळमधील दोन तरुण कारागीर जळगावात काम करतात. ते काही दिवसांपूर्वी केरळमधील त्यांच्या गावाकडे गेले होते. केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. हे कारागीर केरळमधून जळगावात परतल्यानंतर त्यांना ताप, सर्दी, खोकल्याचा अधिक त्रास जाणवला.

त्यामुळेही त्यांचीही तपासणी करुन लाळीचे नमुने पुण्याला पाठवण्यात आले. सर्वांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप आलेले नाही. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित तीन रुग्णावर उपचार सुरू आहेत. या रुग्णालयात कोरोना नियंत्रण कक्ष दोन आणि एकूण 13 क्वॉटची व्यवस्था करण्यात आल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या