जळगाव : जिल्ह्यात आणखी आढळले ७१ करोना बाधित रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात आणखी आढळले ७१ करोना बाधित रुग्ण

एकूण 871 रुग्ण

सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे बुधवारी जिल्हा दौर्‍यावर असतानाच दुपारी जिल्ह्यात 71 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचा अहवाल प्राप्त झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एका दिवसात एवढ्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिल्ह्यात आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या 871 झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील वाढते रुग्ण आणि मयतांची संख्या लक्षात घेता आरोग्यमंत्री राजेश टोपे बुधवारी जिल्हा दौर्‍यावर आले होते. जळगाव शहरातील सर्व महत्त्वाच्या प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी मंत्र्यांच्या उपस्थितीमधील आढावा बैठकीत होते.

ही बैठक दुपारी संपली. त्यानंतर जिल्ह्यात 71 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले.

पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये जळगाव शहर 24, भुसावळ आठ, अमळनेर तीन, चोपडा सहा, पाचोरा एक, धरणगाव एक, यावल चार, एरंडोल एक, जामनेर दोन, जळगाव ग्रामीण दोन, रावेर चार, पारोळा आठ, चाळीसगाव एक, मुक्ताईनगर पाच, परजिल्ह्यातील एका रुग्णांचा समावेश आहे.

सहा रुग्णांना डिस्चार्ज

जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सहा कोरोना रुग्णांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत 350 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांच्या संख्येत पाच रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात आतापर्यंत 107 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com