घराची ओढ ,४०० कि मी चा पायी प्रवास आणि अपघात

घराची ओढ ,४०० कि मी चा पायी प्रवास आणि अपघात

 एक गंभीर जखमी, चौघांना केले क्वारंटाईन

कोरोनामुळे अहमदनगर येथे अडकून पडलेल्या धडगाव येथील दोघा तरुणांना घराची ओढ लागल्याने चक्क नगरहून सुमारे चारशे किमीचा पायी प्रवास करुन दोंडाईचापर्यंत पहाटे 3 वाजेपर्यंत पोहचले. तेथून मोटारसायकलीने येत असतांना सावळदा फाट्यानजीक अपघात झाल्याने दोघांपैकी एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला धुळे येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना घेण्यासाठी आलेले धडगाव येथील तिघे व जखमी सोबतचा एक जण अशा चौघांना शहादा येथे क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, शहादा येथे आतापर्यंत 41 जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर यांनी दिली.

कोरोनामुळे लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने अनेक जण मोठमोठ्या शहरांमध्ये रोजगार व शिक्षणानिमित्त अडकून पडले आहेत. त्यांना आपल्या गावाकडे येण्यासाठी सुविधा नसल्याने विविध मार्गांचा अवलंब करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहेत. अशीच घटना आज दि.17 रोजी घडली. धडगाव येथून नगर येथे रोजगारासाठी गेलेले दोन तरुण तेथेच अडकून पडल्यामुळे त्यांना घराची ओढ लागली होती. गावाकडे येण्यासाठी कुठलेही साधन नसल्याने त्यांनी थेट चारशे किलोमीटर पायी जाण्याचा निश्चय केला. ते दोघेजण नगर येथून पायी निघाले व पहाटे तीन वाजता दोंडाईचा येथे पोहोचले.

त्यांना घेण्यासाठी धडगाव येथून तिघे जण दोन मोटारसायकलीने दोंडाईचा येथे पोहचले. हे पाचही जण मोटारसायकलीने शहाद्याकडे येत असतांना सावळदा फाट्याच्या पुढे त्यांच्या मोटरसायकलीला अपघात झाला. त्यात दोन जण जखमी झाले. ही घटना सकाळी येणार्‍या एका रिक्षाचालकाने पाहिल्याने त्याने त्या जखमींना एका खाजगी रुग्णालयात आणले. येथील वैद्यकीय अधिकार्‍याने तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना घटनेची माहिती दिल्यानंतर चौकशी केली असता नगरहून आलेल्या दोघांना घेण्यासाठी अन्य तीन जण आल्याची माहिती मिळाली. त्यांनी एका गंभीर जखमीला धुळे येथे हलविले तर एका किरकोळ जखमीवर उपचार करण्यात आले. या चार जणांना सुरक्षिततेच्या दृष्टीने शहादा येथे क्वारंटाईन कऱण्यात आले आहे.

दरम्यान,शहादा येथील मोहिदा रस्त्यावरील आदिवासी मुलांच्या वसतिगृहात असलेल्या विलगीकरण कक्षात परदेशातून आलेले तसेच कोरोनाबाधित क्षेत्रातून आलेल्या आतापर्यंत 41 जणांना 14 दिवसासाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. आजाराची कुठलीही लक्षणे आढळून आलेली नाही. केवळ सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच प्रकाशा म्हसावद व शहरातील म्युनिसीपल हायस्कूल येथे पायी प्रवास करून आलेल्यांसाठी शेल्टर होम उभारण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहात पुरेशा सुविधांनीयुक्त 100 खाटांचे आयसोलेशन कक्ष तयार करण्यात आले आहे. सर्व परिस्थितीवर प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी लक्ष ठेवून असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com