….अखेर महापालिका स्थायी समिती सभापती भाजपाचे गणेश गिते

….अखेर महापालिका स्थायी समिती सभापती भाजपाचे गणेश गिते

उच्च न्यायालयाकडुन निकाल घोषीत करण्याचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी

महापालिकेची अर्थिक नाडी असलेल्या स्थायी समितीच्या सभापती पदाच्या निवडीवरुन सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाई आज संपुष्टात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने निवडणुक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेले पाकीट उघडल्यानंतर याचे वाचन केले.

त्यानंतर संबंधीत निवडणुक निर्णय अधिकार्‍यांने झालेल्या निवडणुकीचा निकाल घोषीत करावा असे निर्देश न्यायालयाने दिले. दरम्यान आता स्थायी सभापती पदी भाजपाचे गणेश गिते यांची निवडीची केवळ घोषणा बाकी राहिली आहे.

मुबंई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील तारखेला सुनावणी होऊ शकली नव्हती. त्यावेळी दिलेल्या तारखेनुसार आज सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्ते भाजपा गटनेते जगदिश पाटील यांच्यावतीने वकीलांनी न्यायालयात सादर झालेला निकाल जाहीर करण्याची मागणी केली.

तर शिवसेनेच्यावतीने देखील युक्तीवाद करण्यात आला. अखेर न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकुन घेत स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भातील सादर झालेल्या पाकीटाचे वाचन केले. तसेच स्थायी सभापती पदाची निवडणुक घेणार्‍या निवडणुक निर्णय अधिकार्‍यांनी निकाल जाहीर करावा असे आदेश न्यायालयाने दिले.

न्यायालयाच्या आदेशामुळे आता स्थायी सभापतीचा वाद संपुष्टात आला आहे. गेल्या 5 मार्च 2020 रोजी झालेल्या सभापती पदाच्या निवडणुक प्रक्रियेनुसार भाजपाचे गणेश गिते यांची निवड आता बिनविरोध झाल्यात जमा आहे. आता केवळ निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडुन या निकालाची घोषणा होणे बाकी आहे.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या तौलानिक बळावर आक्षेप घे शिवसेनेने केलेल्या तक्रारीवरुन नगरविकास विभागाच्या एका आदेशानुसार महापालिका नगरसचिव विभागाने स्थगित केलेल्या स्थायी सभापती निवडणुकीला भाजपा गटनेते जगदिश पाटील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

यावर 2 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत तातडीने मतदान घेण्याचे आदेश दिले होते. यानुसार 5 मार्च रोजी विभागीय आयुक्तांनी गुप्त मतदान पध्दतीने मतदान घेतल्यानतंर हा निकाल बंद पाकीटात न्यायालयात सादर केला होता. या मतदान प्रक्रियेवर शिवसेनेेने बहिष्कार टाकला असल्याने गणेश गिते हे बिनविरोध सभापती पदी निवड झाल्याचे आणि केवळ निकाल जाहीर होण्याची प्रक्रिया बाकी असल्याचे स्पष्ट झाले होते. यानुसार न्यायालयाने आज पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

शिवसेनेकडुन शहर विकासात अडथळे

न्यायालयाच्या निकालातून आज सत्याचा विजय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाकडुन शहराचा चांगल्यारितीने विकास सुरू असतांना आता शहर विकास कोण अडथळे निर्माण करीत आहे, हे समोर आले आहे. हा प्रकार म्हणजे राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचे देखील समोर आले आहे. करोनाची साथ सुरू असल्याने याचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी चांगले निर्णय आत्तापर्यत घेता आले असते. मात्र यास सेनेकडुन अडथळा करण्यात आला. आता मात्र आम्ही चांगले काम करु.

– जगदिश पाटील, भाजपा गटनेता मनपा

भाजपा सत्तेसाठी हापापलेला पक्ष

देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली स्थिती सर्वासमोर असुन पंतप्रधान मोदी यांनी देश लॉकडाऊन केला आणि जनतेने घराबाहेर न पडण्याचा सल्ला देत आहे. संपुर्ण देश बंद असतांना नाशिक महापालिकेच्या स्थायी सभापती पदावरुन काय अडले आहे ? असे असतांनाही भाजपाकडुन सुनावणी लावण्याची मागणी करण्यात आली. यानुसार आज त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने निकाला दिला आहे. यावरुन भाजपा करोनाच्या पार्श्वभूमीवर हापापलेला पक्ष असल्याचे समोर आले आहे. आज दिलेला निकाल हा अंतरीम असुन आपल्या याचिकेवर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार असुन यात आपल्याच बाजुने निकाल लागणार असे कागदपत्र आपल्याजवळ आहे.

– अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते मनपा.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com