अमळेनर तालुक्यात जमावाकडून आरोपीचा खून
स्थानिक बातम्या

अमळेनर तालुक्यात जमावाकडून आरोपीचा खून

Balvant Gaikwad

अमळनेर तालुक्यात जमावाच्या मारहाणीत पुन्हा एका आरोपीचा खून झाला. यापूर्वी शुक्रवारी अमळनेरात राकेश चव्हाणचा खून झाल्याची घटना ताजी असताना सोमवारी चांदणी कुर्हे येथे एका आरोपीचा मारहाणीत मृत्यू झाला.

तालुक्यातील चांदणी कुर्हे येथील खूनाच्या गुन्ह्यातील शिक्षा भोगून आलेल्या रवींद्र अजबसिंग पाटील (वय, 48 ) याचा सोमवारी खून झाला आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी गावातीलच एका डॉक्टर महिला व तिच्या आईचा त्याने खून केला होता. त्यानंतर त्याने नाशिक व पैठण कारागृहातून शिक्षा भोगली होती. 2 वर्षापूर्वी तो शिक्षा भोगून सुटला होता.

त्यानंतर तो सुरत येथे राहत होता. 15 दिवसांपूर्वी तो आपल्या गावी परतला होता. गावात आल्यापासून तो कुरापती करत होतो. काही दिवसांपूर्वी त्याने गावातील एका नागरिकाचा कडबा जाळला होतो. त्यामुळे ग्रामस्थ त्याच्यावर संतापले होते. सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गावातील काही लोकांशी त्याचे भांडण झाले.

या घटनेत त्याला जमावाने मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. पोलीस पाटील ज्ञानेश्वर प्रताप पाटील यांनी त्याला उपचारासाठी रिक्षाने ग्रामीण रुग्णालयात आणले. त्याच्यावर डॉ.प्रकाश ताडे यांनी उपचार केले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व वरिष्ठ अधिकार्‍यांनी भेट देत पाहणी केली.

यापूर्वी शुक्रवारी झाला होता

खून अमळेनर शहरात राकेश चव्हाण या आरोपाचा शुक्रवारी (दि.10) रोजी खून झाला होता. या प्रकरणात चार जणांना अटक झाली होती. त्यानंतर रविवारी रात्री 18 जणांना ताब्यात घेतले.

Deshdoot
www.deshdoot.com