Friday, April 26, 2024
HomeUncategorizedस्थलांतरीत बालिकेच्या अपहरण प्रकरणातील ठकसेन नाशिक पोलिसांच्या जाळ्यात

स्थलांतरीत बालिकेच्या अपहरण प्रकरणातील ठकसेन नाशिक पोलिसांच्या जाळ्यात

नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल; अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

जळगाव – 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून विदर्भातील मूळ गावी निघालेल्या 12 वर्षीय बालिकेसह, तिच्या 19 वर्षीय भावाला मदती करण्याचा बहाणा करुन बालिकेचे अपहरण केल्याप्रकरणातील आरोपी गणेश सखाराम बांगर (वय 32, रा.मालेगाव, ता. जि.वाशीम) यास नाशिक शहरात पोलिसांनी पकडले. त्यास ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नाशिककडे रवाना झाला आहे. या आरोपीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मुलुंड ( मुंबई ) येथे मजुरीचे काम करणारे कुटुंबीय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मूळ गावी सिसामासा ( अकोला ) येथे जात होते. या वेळी बहीण, तिचा भाऊ व त्यांचे कुटुंबीय जळगावातील कालिंका माता मंदिराजवळील महामार्गानजीक 19 मे रोजी दुपारी जेवण करुन सावलीत बसलेले होते. त्या ठिकाणी गणेश सखाराम बांगर गेला. त्याने बालिकेच्या भावाशी चर्चा केली. माझ्याकडे मोठे वाहन आहे. त्या वाहनाचे टायर फुटल्याने दोन तास दुरुस्तीकरिता लागेल. पण, तुम्हाला तुमच्या गावाला पोहचण्यासाठी मदत करू शकतो. दोघं बहीण, भाऊ मोटारसायकलवर बसा, असे त्याने सांगितले.

त्यानुसार ते भाऊ, बहीण मोटारसायकल वर बसले. त्यांना घेवून जात असताना दुपारी 3.45 वाजेच्या सुमारास नशिराबाद ते भुसावळ महामार्गावरील डॉ . उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढे त्याने मोटारसायकल थांबवली. महामार्गावर पुढे पोलिसांची गाडी असल्याची बहाणा करुन त्याने मोटारसायकलवरील तिसरा प्रवाशी त्या बालिकेच्या भावाला उतरवले. तू पुढे चालत ये, असे त्या बालिकेच्या भावास सांगण्यात आले. त्या नंतर ठकसेन गणेशने बालिकेचे अपहरण केले. याबाबत त्या बालिकेच्या भावाच्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बालिका सापडली

याबाबत पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले व अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी पोलिस यंत्रणा तत्काळ राबवून भुसावळ ते अकोला दरम्यान नाकाबंदी केली. आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले. नंतर पोलिसांना ती बालिका 20 मे रोजी अमरावती ग्रामीण विभागातील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुखरुप आढळली होती.आरोपीच्या शोधासाठी भुसावळ येथील डीवायएसपी गजानन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बापू रोहम आदींनी देखील पथके रवाना केले होते.

मोटारसायकल चोरीची

हे पथके हे आरोपी गणेशचा शोध वाशीम, मालेगाव, कारंजा- लाड, मंगरुळ पीर, अकोला, मूर्तिजापूर, अमरावती या ठिकाणी घेत होते. त्याने कारंजा ग्रामीण विभागातून चोरलेली व या अपहरणात वापरलेली मोटारसायकल लोणी पोलीस स्टेशन हद्दीत बेवारस मिळाली होती. आरोपी विरुद्ध कारंजा ग्रामीण, मालेगाव, मंगरुळ पीर , वाशीम शहर जिल्हा – वासीम, वडगाव रोड, पुसद शहर, (जि.यवतमाळ), जून्नर पोलीस स्टेशन (जि.पुण), जुहू पोलीस स्टेशन. मुंबई , नानाल पेठ पोलीस स्टेशन, परभणी , मूर्तुजापूर पोलीस स्टेशन अकोला , फैजलपुरा पोलीस स्टेशन, अमरावती शहर, गंगापूर पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे चोरी, फसवणूक, विनयभंग, विश्वासघात, मुली, महिलांचे अपहरण आदी गुन्हे दाखल आहेत. त्याची माहिती देण्यासाठी बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

पोलिसांना 25 मे रोजी आरोपी गणेशबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली. तो आंबेगाव (जि.पुणे) येथून नाशिककडे येत आहे. यासंदर्भात नाशिक शहर उपायुक्त (गुन्हे) यांच्याशी अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी तत्काळ चर्चा केली. नाशिक शहर गुन्हे युनिट क्र.1 चे पोलीस निरीक्षक वाघ, उपनिरीक्षक बलराम पालकर, हेड कॉन्स्टेबल रवींद्र बागुल, नाईक विशाल काठे, कॉन्स्टेबल विशाल देवरे आदींनी नाशिक रोड परिसरातून ठकसेन आरोपी गणेश बांगर यास ताब्यात घेतले आहे. त्याला नशिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सुधाकर लहारे व पथक नाशिकला रवाना झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या