Wednesday, April 24, 2024
Homeनाशिक9 हजार नागरिकांनी घेतला शिवभोजन आस्वाद

9 हजार नागरिकांनी घेतला शिवभोजन आस्वाद

नाशिक । प्रतिनिधी

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभर सुरु झालेली शिवभोजन थाळी लोकांच्या पसंतीस उतरत आहे. नाशिक जिल्ह्यात 15 दिवसात नऊ हजार गोरगरिबांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे. जिल्ह्यातील पाच के्ंरदांना थाळीचे साडेतीन लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे रविवारी नाशिक दौर्‍यावर असताना त्यांनी वडाळानाका येथील केंद्राला भेट देऊन शिवभोजन थाळीबाबत नागरिकांशी संवाद साधला होता. थाळीची चव, अन्नपदार्थ दर्जा, स्वच्छता याबाबत त्यांनी विचारपूस केली होती. नाशिकमध्ये ही थाळी लोकांच्या पसंतीस उतरत आहे. ठाण्यानंतर नाशिकमध्ये या योजनेचा सर्वाधिक लाभ घेण्यात आल्याचे राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गरीब आणि गरजूंना केवळ दहा रुपयात जेवण दिले जात आहे. जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यात चार ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील कँटिन, बाजार समिती, नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसर, वडाळानाका व मालेगाव बाजार समिती या ठिकाणी शिवभोजन केंद्र आहे.

दुपारी 12 ते 2 या वेळेत 150 थाळी प्रति केंद्र सध्या वितरीत केली जात असून जिल्हयास दररोज एक हजार थाळीचे उद्दीष्ठ देण्यात येणार आहे. त्यापोटी पहिल्या काही महिन्यांसाठी जिल्हा प्रशासनाला 36 लाख रूपयांचे अनुदान प्राप्त झाले असून दर पंधरा दिवसांची ग्राहकांची झालेली नोंदणीनूसार उर्वरित अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. शहरात 50 रुपयांपैकी 40 शासन आणि 10 लाभार्थ्यांकडून तर ग्रामीणमध्ये 35 पैकी 10 लाभार्थी आणि 25 रुपये शासनाकडून केंद्र चालकांना दिले जाणार आहे.

मागील पंधरा दिवसांत जिल्हयात 8 हजार 946 नागरिकांनी थाळीचा लाभ घेतला.शासनाकडून 3 लाख 57 हजार 840 लाख रूपये अनुदान शिवभोजन केंद्र चालकांना देण्यात आले आहे.

– अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या