सिन्नर फाटा परिसरात ९० लाखांचे कोकेन जप्त; गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

सिन्नर फाटा परिसरात ९० लाखांचे कोकेन जप्त; गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

नाशिकरोड | प्रतिनिधी 

सिन्नर फाटा रेल्वे गेट परिसरात ९० लाख रुपये किंमतीचा कोकेन नावाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने छापा टाकून काल रात्रीच्या सुमारास ही कारवाई केली.

पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, एक व्यक्ती एका बॅगमध्ये कोकेन विक्रीसाठी येणार असून इतर दोघे कोकेन खरे आहे किंवा खोटे याबाबतची शहनिशा करणार असल्याचे समजले. त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट दोन च्या पथकाने रस्त्याच्या कडेला पोलीस वाहने पार्क करून वालदेवी पुलानजीक असलेल्या सिन्नर फाटा रेल्वे गेटजवळ नजर ठेवली.

यानंतर संशयित व्यक्ती बॅग घेऊन शेजारील गार्डनच्या आत बाहेर करत होता. यानंतर याठिकाणी इतर दोघेजन आले. त्यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर संशयित व्यक्तीने त्यांना बॅगमधून एक प्लास्टिकची पिशवी काढून दाखवली.

या तिघांचा संशय आल्याने पथकाने तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. यामध्ये संशयित बॅगधारक मनोज कुमार याप्रकाश यादव, रा. उत्तरप्रदेश, साहेब्जान साबीदअली शेख, जाधव संकुल नाशिक व नितीन खोडके रा. सिन्नर फाटा नाशिक या तिघांना ताब्यात घेतले.

यानंतर या संशयितांची चौकशी केली असता बॅगधारक व्यक्तीकडून ८९ लाख ६० हजार रुपयांची पांढऱ्या रंगाची कोकेन पावडर यासह तीन मोबाईल आणि साडेतीन हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.  या कारवाईत एकूण ८९ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com