धुळे : जिल्ह्यात ६ रुग्ण आढळले
स्थानिक बातम्या

धुळे : जिल्ह्यात ६ रुग्ण आढळले

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

दोघांचा मृत्यू ; १४ जणांची करोनावर मात

धुळे शहर व शिरपूरात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 156 कोरोना बाधित आढळून आले असून 19 बाधितांचा मृत्यू झाला तर रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून धुळे व शिरपूर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. शहरात 97, शिरपूर तालुक्यात 27, धुळे तालुक्यात एक, धुळे ग्रामीण 59, शिंदखेडा तालुक्यात पाच, साक्री तालुक्यात पाच रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत.

आतापर्यंत 67 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर धुळे शहरातील आझादनगर परिसरातील एक आणि शिरपूर येथील बालाजी मंदिर परिसरातील एका 80 वर्षीय वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

14 जणांची कोरोनावर मात

धुळे जिल्ह्यात 14 जणांनी एकाच दिवशी कोरोनावर मात केली आहे. येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातून आज 14 रुग्णांना निरोप देण्यात आला. तीन रुग्ण 20 मे रोजी तर 11 रुग्ण 22 मे रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा कारागृहातील तीन व्यक्ती, वाडी शेवाडी येथील 29 व 36 वर्षीय तरुण, शिरुड येथील 39 वर्षीय पुरुष, बल्हाणे येथील 36 वर्षीय पुरुष व 34 वर्षीय महिला, धुळे येथील कोरकेनगर येथील 33 वर्षीय पुरुष, चितोडरोड येथील हटकरवाडीतील 47 वर्षीय महिला, चक्करबर्डी पाईप कारखाना येथील 47 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय तरुण आणि एका 58 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 81 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

धुळ्यात 54 कंटेनमेंट झोन

धुळे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 97 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 54 जणांनी कोरोनावर मात केली असून दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 33 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. वाढत्या रुग्णांमुळे धुळ्यात 54 कंटेनमेंट झोन महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहेत. या कंटेनमेंट झोनमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com