नाशिक : शुन्य ते बारा वयोगटातील ५६ बालके झाली करोनामुक्त
स्थानिक बातम्या

नाशिक : शुन्य ते बारा वयोगटातील ५६ बालके झाली करोनामुक्त

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून आलेल्या करोनाच्या संसर्गात अनेकजण होरपळले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ हजार ४७४ पर्यंत पोहोचली. यापैकी ९७३ रुग्णांनी करोनाशी दोन हात करून हा लढा जिंकला आहे.

लढ्यात जिल्ह्यातील ८७ बालकांचाही समावेश असल्याने त्यांच्या पालकांसह आरोग्य यंत्रणेचाही जीव टांगणीला लागला होता. मात्र आरोग्य यंत्रणेचे योग्य उपचार, पालक आणि बालकांची उपचारपद्धतीला मिळालेली साथ त्यामुळे आज जिल्ह्यातील ५६ बालके कोरोनामुक्त झाली आहेत. तसेच उर्वरित ३१ बालकेही लवकरच करोनामुक्त होवून सुखरुप घरी परततील, असा विश्वास आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे.

करोनाने पाच दिवसांच्या अर्भकापासून तर ९० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकालाही आपल्या विळख्यात घेतले आहे. मात्र अशा नाजूक परिस्थितीतही आरोग्य यंत्रणेने अतिशय दक्षतेने करोनाविरोधातील लढा सुरू ठेवल्याने त्याचे फलित समोर येत आहेत. त्यामुळेच ही कोवळी बालके या करोनाच्या विळख्यातून सुखरुप बाहेर पडली आहेत.

जिल्ह्यात १४७४ रुग्णांना कोरोनाची लागण झाली. त्यातील ९७३ रुग्ण आज बरे होवून घरी परतले आहेत. या रुग्णसंख्येमध्ये ८७ बालकांचा समावेश असल्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढे मोठा पेच उभा राहिला होता.

या मुलांना परिस्थिती समजावून सांगणे, त्यांना परिवारापासून दूर ठेवणे, वेळेवर उपचार करणे अशी तारेवरची कसरत आरोग्य यंत्रणेने केली. त्यामुळे आज ० ते १२ या वयोगटातील ५६ बालके कोरोनामुक्त झाली आहेत. उर्वरित ३१ बालकेही लवकरच बरे होवून आपल्या घरी जातील, असा विश्वास आरोग्य यंत्रणेला आहे.

मालेगावात सर्वाधिक बालके करोनामुक्त

जिल्ह्यात ० ते १२ वयोगटातील पहिला करोनाबाधित बालक १० एप्रिल रोजी आढळून आले. त्यानंतर हा आकडा हळूहळू वाढत ८७ पर्यंत पोहोचला. कोरोनाचे रुग्ण जसे मालेगावात जास्त आहेत, तसेच कोरोनाबाधित बालकांचे प्रमाणही मालेगावात सर्वाधिक आहे. मालेगावात ४३ बालकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यात २६ मुले व १७ मुली आहेत. त्यापाठोपाठ येवला आणि नाशिकमधील प्रत्येकी चार, तर सिन्नर, चांदवड, निफाड येथील प्रत्येक एका बालकाचा समावेश होता. सद्यस्थितीत ५६ बालके कोरोनामुक्त झाली आहेत. ३१ बालकांवर उपचार सुरू असून, ही सर्व बालके उपचाराला प्रतिसाद देत आहेत. त्यांनाही लवकरच घरी सोडण्यात येणार आहे.

पालकांच्या समुपदेशनावर भर

बालकांना कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. लक्षणेदेखील सौम्य असतात. त्यामुळे अशा बालकांसह त्यांच्या पालकांच्या समुदेशनावर भर दिला. त्यांना सर्वसाधारण औषधी देण्यात आली. नवजात बालकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी स्तनपान गरजेचे होते. त्यामुळे बालकांसह आईचीदेखील खूप काळजी घेतली.

डॉ.पंकज गाजरे, बालरोगतज्ज्ञ,

भीती दूर ठेवून केली कोरानावर मात

मी मालेगाव नगरपालिकेच्या रुग्णालयात परिचारिका आहे. माझ्यासह पती व मुलालाही कोरोनाची लागण झाली. आम्ही येथील कोविड केअर सेंटरमध्ये ॲडमिट होतो. मुलाला कोरोना झाल्याने आम्ही खूप घाबरलो होतो. पंरतु त्याने उपचारास योग्य साथ दिली व आरोग्य विभागानेही काळजी घेतली. त्यामुळे आम्ही तिघे आज करोनामुक्त आहोत.

मिनाक्षी दुधाणे,
कोरोनामुक्त बालकाची आई, मालेगाव

आरोग्य यंत्रणेचे यश

माझ्यासह पत्नी व माझा दोन वर्षांचा मुलगा असे तिघे कोरोनाबाधित झालो होता. आरोग्य यंत्रणेने वेळोवळी गरम पाणी, काढा, जेवण देत आमची विशेष काळजी घेतली. आरोग्य यंत्रणेने अहोरात्र केलेल्या प्रयत्नांमुळे आमच्यासह मुलगा कोरोनामुक्त झाला आहे.

रईस शेख,
सिडको, कोरोनामुक्त बालकाचे वडील, नाशिक. 

Deshdoot
www.deshdoot.com