नाशिक मनपा क्षेत्रातून आतापर्यंत ३७७२ मजूर मध्यप्रदेश आणि झारखंड सीमेपर्यंत पाठवले

नाशिक मनपा क्षेत्रातून आतापर्यंत ३७७२ मजूर मध्यप्रदेश आणि झारखंड सीमेपर्यंत पाठवले

नाशिक | प्रतिनिधी 

करोना विषाणूमुळे राज्यात संचारबंदी लागू असल्याने महाराष्ट्र राज्यात इतर राज्यातील अडकलेल्या परप्रांतीय मजूर, विस्थापित कामगार, विद्यार्थी, पर्यटक व इतर नागरिकांना आपल्या मुळगावी पायपीट करत जावे लागू नये म्हणून राज्य शासनाने बस सोडण्याचा निर्णय घेतला. जवळपास एकट्या नाशिक मनपा क्षेत्रातून ३७७२ मजुरांना गेल्या दोन-तीन दिवसांत मध्यप्रदेश आणि झारखंडच्या सीमेवर सोडण्यात आले आहे. यासाठी १७१ बसेस नाशिक आगर क्रमांक १ आणि दोनमधून सोडण्यात आल्या होत्या.

स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मुंबई आग्रा महामार्गावरून पायी चालत आपल्या मुळ गावी परतणाऱ्या इतर राज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या सिमेपर्यंत मोफत बसने सोडण्याची व्यवस्था गेल्या आठवड्यात शनिवार (दि. ०९) पासून करण्यात आली होती.

त्यानुसार आजपर्यंत महानगर पालिका क्षेत्रातून नाशिक महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त नियोजनातून नाशिक आगार क्रमाक १ व २ मधून १७१ बस द्वारे ३७७२ इतक्या लोकाना त्याच्या मुळगावी जाण्यास मदत झाली आहे. त्यापैकी २ बसेस झारखंड राज्याच्या सिमेपर्यंत व १६९ बसेस मध्यप्रदेशच्या सिमेपर्यंत पाठविण्यात आल्याची माहिती प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रण नितीन मैंद, विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील, आगार व्यवस्थापक दिलीप नलावडे, किशोर पाटील व प्रियांका उनवणे यांच्या नियोजनातूनच ही शक्य झाल्याचे नाशिक महानगरपालिकेच्या समन्वय अधिकारी तथा उप आयुक्त समाज कल्याण यांनी सांगितले.

आणखी दोन दिवस नागरिकांना जाण्यासाठी संधी 

नाशिक मनपा कार्यक्षेत्रात अडकलेले मजूर, विस्थापित कामगार, विद्यार्थी, पर्यटक व इतर नागरिक यांना आपल्या मुळगावी जावयाचे आहे अशा मजूर, विस्थापित कामगार, विद्यार्थी, पर्यटक व इतर नागरिक यांनी नजीकच्या पोलीस ठाणे येथे संपर्क करून आपले नाव, सध्याचा पत्ता, मोबाईल क्रमांक., आधार क्रमाक, जाण्याचा ठिकाणाचा संपूर्ण पत्ता इत्यादी माहिती देऊन नाव नोदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com