‘हम होंगे कामयाब’; करोनामुक्त २८ पोलिसांसह इतर ८ आठ रुग्णांना आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज

‘हम होंगे कामयाब’; करोनामुक्त २८ पोलिसांसह इतर ८ आठ रुग्णांना आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज

नाशिक : मालेगांव येथे बंदोबस्तात करोनाची लागण झालेल्या आणि उपचाराअंती करोनामुक्त झालेल्या एकूण ७ पोलीसांना आज संध्याकाळी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांचे उपस्थितीत डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, आडगांव येथे डिस्चार्ज देण्यात आला. या पोलीसांना निरोप देतांना पोलीस बॅण्डने ‘हम होंगे कामयाब’ची धुन वाजवून आरोग्य व पोलीस यंत्रणेला लढण्याचे बळ दिले. तेव्हा करोनामुक्त पोलिसांच्या चेहऱ्यावरही आत्मविश्वासाची लकेर उमटली होती.

यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड , आमदार दिलीप बनकर, मविप्रच्या सरचिटणीस निलीमा पवार उपस्थित होते.

मालेगाव येथे कर्तव्य बजावत असतांना कोरोनाची लागण झालेल्या ३३ पोलिसांना डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, आडगांव येथे २५ एप्रिल रोजी दाखल करण्यात होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने या रुग्णावर योग्य उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले. आज आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व नाशिक येथील जाकीर हुसेन रुग्णालयातून २८ पोलिस तसेच शहरातील इतर आठ रुग्ण असे एकूण ३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आशादायी : आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे

राज्यात २५ हजार ९२२ कोरोना पॉझिटीव्ह असून, ५ हजार ५०० रुग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत. राज्यातील मृत्युदरही अटोक्यात आहेत.  तसेच नाशिक जिल्ह्यातही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आशादायी असून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीसही लवकरच यातून बरे होतील. मालेगाव मधेही बऱ्याच प्रमाणावर परिस्थितीत अटोक्यात असल्याचे डॉ. टोपे यांनी सांगितले.

युनानी, होमिपॅथी व आयुर्वेदा या तिघांच्या एकत्रीकरण समिती गठीत

कोरोनावर मात करण्यासाठी डॉ. तात्याराव लहाने यांचे अध्यक्षतेखाली तसेच आयुषचे डॉ. कोहली व डॉ. खोलप यांच्या माध्यमातून युनानी, होमिओपॅथी व आयुर्वेदा या तिघांचे एकत्रीकरण आयुष मंत्रालयाने  समिती गठीत केली आहे. या आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शसूचनेचे सर्व नागरिकांनी पालन केले तर निश्चितच त्याचा फायदा सर्वदूर होणार असल्याचे मत डॉ.टोपे यांनी व्यक्त केले.

मालेगांवातील एकही रुग्ण व्हेंटीलेटरवर नाही

मालेगावातील रुग्ण संख्या जास्त असली तरि येथील रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत आहेत. येथील एकही रुग्णाला अद्याप व्हेंटीलेटर लावण्याची आवश्यकता भासली नाही. तसेच ते म्हणाले कोरोनावर मात करण्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक असून सर्व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

डॉ. टोपे म्हणाले, मालेगाव शहरातील अधिग्रहीत रुग्णालयात सध्या २० ते २५ टक्के रुग्ण आहेत. तसेच खाजगी रुग्णालयात ओपीडी सुरु करण्यात आली आहे. मालेगावात टेलिमेडिसीन व टेलीरेडिओग्राफी दोन दिवसात सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्थानिकांच्या मागणीनुसार मालेगावातील हज हाऊस अधिग्रहीत करण्यात आले असून कोविड १९ लॅबला किडस् नियमित पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com