मालेगावी ३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह; महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश
स्थानिक बातम्या

मालेगावी ३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह; महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मालेगाव | प्रतिनिधी

मालेगाव शहरात करोनाने पुन्चाहा एकदा कहर करायला सुरुवात केली आहे. संपूर्ण दिवसभरात आज मालेगावी 32 संशयित रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने मालेगावकरांच्या चिंतेत अधिकची भर पडली आहे.

यात मनपा सहाय्यक आयुक्तांसह, मनपा सेवक, दहा पोलीस तसेच पोलिस वसाहतीतील चार वर्षीय व कलेक्टर पट्टा भागातील अकरा वर्षीय लहान मुले व सहा महिलांचा समावेश असल्याने मालेगावकर चिंताक्रांत झाले आहेत.

गत पाच दिवस बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने व पाचशे पन्नास पेक्षा अधिक रुग्णांची घरवापसी झाल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला होता.

मात्र, आज पुन्हा दिवसभरात तब्बल बत्तीस पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जनतेत पुन्हा चिंतेचे सावट पसरले आहे. या रुग्णांमुळे शहरातील बाधित रुग्णांची संख्या 771 जाऊन पोहोचली आहे.

मनपा आयुक्त तसेच स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्तांचे पाठोपाठ आज प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त व त्यांच्याच कार्यालयातील संगणक विभाग सेवकाचा अहवाल पॉझिटिव आल्याने मनपा अधिकारी व सेवकांमध्ये  चिंता व्यक्त केली जात आहे.

या अधिकारी व सेवकाच्या संपर्कात आलेल्यांना काँरन्टाईन करण्याची प्रक्रिया आरोग्य यंत्रणेतर्फे सुरू करण्यात आली होती. काल पॉझिटिव्ह आलेल्या सहा पोलिसांच्या संपर्कातील 73 पोलिसांच्या स्त्राव चे नमुने आज मनपा आरोग्य पथकातर्फे घेण्यात येऊन तातडीने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

आज पुन्हा करोना सदृश्य लक्षणे दिसत असलेले 20 संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. दरम्यान, शहरात बंदोबस्तावर तैनात पोलीस पुन्हा करोनाने संक्रमित होण्यास प्रारंभ झाल्याने अधिकारीसह पोलिसांमध्ये चिंतेचे मळभ पुन्हा दाटले आहे.

आयशा नगर पोलीस स्टेशन, हिम्मतनगर पोलीस वसाहत, रेल्वे सुरक्षा विभाग मधील 10 पोलीस पॉझिटिव्ह आढळून आले. पोलीस वसाहतीतील चार वर्षीय बालक पॉझिटिव्ह आल्याने हे वृत्त यंत्रणेस धक्का देणारे ठरले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com