मालेगावी २४ तासांत २१ नवे करोना पॉझिटिव्ह; आतापर्यंत ४५ दगावले
स्थानिक बातम्या

मालेगावी २४ तासांत २१ नवे करोना पॉझिटिव्ह; आतापर्यंत ४५ दगावले

Dinesh Sonawane

मालेगाव । प्रतिनिधी

उत्तर महाराष्ट्रात हॉट स्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. आज दिवसभरात २१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने करोना बाधित रुग्णांची संख्या ६९६ वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान, संशयित दोघा मृतांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने करोना बळींची संख्या ४५ झाली आहे. तर, सहारा रूग्णालयात आज करोना सदृश्य लक्षणे दिसत असलेल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संशयित रुग्ण मृत्यूची संख्या ७० वर पोहोचली आहे.

आज दिवसभरात प्राप्त तिघा अहवालांमध्ये दहा संशयित रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले यामध्ये श्रीराम नगर भागातील 75 वर्षीय वृद्धा सह तालुक्यातील लोणवाडे येथील 55 वर्षीय महिलेसह 28 वर्षीय युवक तसेच शहरातील पवार गल्ली, गुलशननगर, रसुलपुरा, जोहर कॉलनी येथील रुग्णांचा समावेश आहे.

तसेच रात्री उशिराने आलेल्या अहवालात मालेगावी पुन्हा ११ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यामध्ये द्याने येथील सहा, रावळगाव येथील दोघे,
सहारा हॉस्पिटल, मोतीबाग नाका व अमन चौकातील प्रत्येकी एका रुग्णाचा  समावेश आहे.

तालुक्यातील रावळगाव, लोणवाडे व चंदनपुरी शिवारात करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने या तिघा गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रांत विजयानंद शर्मा यांनी आज घोषित केले असून या गावांमध्ये संचारबंदी लागू राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या गावांमध्ये आरोग्य यंत्रणेतर्फे सर्व घरांमध्ये संशयित रुग्ण तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश प्रांत विजयानंद शर्मा यांनी दिले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com