पुढील वर्षात २० सार्वजनिक सुट्ट्या; प्रजासत्ताक दिनासह चार सुट्ट्या रविवारी 
स्थानिक बातम्या

पुढील वर्षात २० सार्वजनिक सुट्ट्या; प्रजासत्ताक दिनासह चार सुट्ट्या रविवारी 

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी 

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेच्या आधारे सन २०२० या वर्षात राज्य सरकारकडून २० सार्वजनिक सुट्ट्यांची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनासह चार सुट्ट्या रविवारी येत असून उर्वरित २० सुट्ट्याचे दिवस सार्वजानिक सुट्टी म्हणून अधिसूचित करण्यात आले आहेत. यात ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पाच सुट्ट्या असणार आहेत.

जानेवारी महिन्यात येणारा प्रजासत्ताक दिन रविवारी येत असून त्याव्यतिरिक्त अन्य एकही सार्वजनिक सुट्टी या महिन्यात नसणार आहे. फेब्रुवारीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती (दि.१९) व महाशिवरात्री (दि.२१) या दोन दिवशी सुट्टी राहील. तर मार्च महिन्यात होळीचा दुसरा दिवस (दि.१०) व मराठी नववर्षाचा पहिला दिवस असणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी ( दि.२५) सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रामनवमी (दि.२) व महावीर जयंती ( दि.६), गुडफ्रायडे (दि.१०) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४) या चार  सुट्ट्या एप्रिलमध्ये असणार आहेत. मे  महिन्यात महाराष्ट्र दिन (दि.१), बुद्ध पौर्णिमा ( दि.७), रमझान ईद (दि.२५) अशा दोन सुट्ट्या देण्यात येणार आहेत. जून व जुलै या दोन महिण्यात एकही सार्वजनिक सुट्टी देण्यात आलेली नाही. ऑगस्ट मध्ये बकरी ईद (दि.१), स्वातंत्र्य दिन (दि. १५), पारशी नववर्ष दिन (दि. १६) व गणेश चतुर्थी (दि.२२) , मोहरम (दि. ३०) अशा पाच दिवस सुट्ट्या असून दि.१६ ऑगस्टची सुट्टी रविवारी असणार आहे.

सप्टेंबर महिन्यात एकही सार्वजनिक सुट्टी नाही. ऑक्टोबर महिन्यात महात्मा गांधी जयंती (दि.२), दसरा (दि.२५), ईद ए मिलाद  (दि.३०) असे तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये दिवाळी अमावस्या /  लक्ष्मीपूजन (दि.१४), दिवाळी / बलिप्रतिपदा (दि.१६) व गुरुनानक जयंती (दि.३०) अशा तीन सुट्ट्या आहेत. तर डिसेंबर मध्ये ख्रिसमस ( दि.२५) ची सुट्टी असणार आहे.

या सुट्ट्या रविवारी 

प्रजासत्ताक दिन, पारशी नववर्ष दिन, मोहरम व दसरा या चार सुट्ट्या रविवारी येत आहेत. तर केवळ ऑगस्ट मधील स्वातंत्र्यदिन आणि पारशी नववर्ष दिन या सुट्ट्या जोडून असणार आहेत. बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी दि. १ एप्रिल रोजी सुट्टी राहिला. मात्र या दिवशी केवळ बँका बंद राहतील. इतर शासकीय आस्थापना या दिवशी नियमित वेळेत सुरु राहणार आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com