लोहोणेर : गिरणा नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू
स्थानिक बातम्या

लोहोणेर : गिरणा नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

लोहोणेर | वार्ताहर

देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील एक अठरा वर्षीय युवकाचा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. हा युवक मित्रासोबत गिरणा नदीपात्रात अंघोळीसाठी गेला होता. साहिल भगवंत देशमुख ( वय १८ ) असे या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास साहिल हा त्याच्या मित्रासोबत गिरणा नदीपात्रात अंघोळीसाठी गेला होता. नदीपात्राची खोली लक्षात न आल्याने साहिल पाण्यात बुडाला. यानंतर त्याच्या मित्राने आरडा ओरड केली. मात्र, अर्धा तास साहिल पाण्यातच होता.

नदीपात्रालगत असलेल्या शेतकऱ्यांनी धाव घेत साहिलला वाचविण्यासाठी नदीपात्रात उड्या घेतल्या. यानंतर साहिलला शोधून बाहेर काढण्यात आले. ताबडतोब त्याला लोहोणेर येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात उपचारासाठी दाखल  करण्यात आले होते.

दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश निकुंभ यांनी तातडीने देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जे. एस.कांबळे यांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारा दरम्यान त्याचे निधन झाले.

मयत साहिल याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली असून तो आता प्रथम वर्षास कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणार होता. त्याचे वडील हे रिक्षा चालक असून आई आशा सेविका आहे.

त्याच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ असा परिवार आहे. तो भगवंत ( बाळू ) देशमुख याचा मोठा मुलगा होता. देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी उशिरा त्याच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com