येवला मुक्तीभूमीतील विकासकामांसाठी १५ कोटी निधी मंजुर
स्थानिक बातम्या

येवला मुक्तीभूमीतील विकासकामांसाठी १५ कोटी निधी मंजुर

Dinesh Sonawane

नागपूर/नाशिक

येवला येथील मुक्तिभूमी स्मारक परिसरात प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय-वाचनालय, कर्मचारी निवासस्थान, अतिथी निवासस्थान बांधणे व इतर सुविधा पुरविणे याबाबत खर्चाच्या अंदाजपत्रकास राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रशासकीय मंजुरी दिली असून त्यासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या गावांचा विकास करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

त्यानुसार यापूर्वी ऐतिहासिक स्थळांच्या विकास कामांना मंजुरी प्रदान केली आहे. परंतु सदर स्थळांच्या यादीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभुमी स्मारक येवला या ऐतिहासिक स्थळांचा समावेश नसल्याने या ऐतिहासिक स्थळाचे अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेऊन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.छगन भुजबळ यांच्या शिफारसीनुसार समितीने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्याकडून या स्थळाचा विकास करण्यासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीस शासनाच्यावतीने मान्यता दिली आहे.

ना.छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला (जि.नाशिक) येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक मुक्तिभूमी चा विकास करून याठिकाणी ठिकाणी भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेबांचे भव्य स्मारक निर्माण करण्यात आलेले आहे. दादरची चैत्यभूमी आणि नागपुरच्या दिक्षाभूमी प्रमाणेच येवल्याच्या मुक्तीभुमीला ऐतिहासिक महत्व आहे.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाला मुक्तिभूमी म्हणून संबोधण्यात येते.

दरवर्षी १३ ऑक्टोबर,विजयादशमी व दि.१४ एप्रिल या दिवशी देशभरातून लाखो बौद्धबांधव मुक्तीभूमीवर डॉ.बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येत असतात. तसेच वर्षभर हजारो पर्यटक आणि बौद्धबांधव येथे भेटी देत असतात. या स्थळाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श लाभल्यामुळे हे स्थान अतिमहत्वाचे तीर्थस्थळ बनलेले आहे.

या स्थळाच्या विकासाठी ना.छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.  त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे यांनी सदर स्मारक परिसरात प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, वाचनालय, कर्मचारी निवासस्थान, संरक्षण भिंत, अॅम्पीथिएटर, लॅण्डस्केपिंग, अतिथिगृह इ.बांधकामांना प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे अंदाजपत्रके व आराखड्यावर सविस्तर प्रस्ताव सादर केलेला होता. मात्र शासनाकडे गेले अनेक दिवस सदर प्रस्ताव मंजूरीसाठी प्रलंबित राहिला होता.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर छगन भुजबळ यांना सामाजिक न्याय मंत्रीपदाची जबाबदारी मिळताच त्यांनी तातडीने या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली असून यासाठी १५ कोटी रुपये निधीस मंजुरी दिली आहे. त्यामुळे येवला मुक्तीभूमीच्या विकासाची कामे लवकरच सुरु होणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com