दिवसभरात १४ करोनाबाधित रुग्ण आढळले; येवला, दिंडोरीसह बागलाणमध्येही शिरकाव

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी 

आज सकाळी नाशिक शहरातील सिन्नर फाटा, पाटील नगर आणि मालेगावातील इस्लामपुरा याठिकाणी नव्याने करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आज सायंकाळी प्राप्त अहवालात जिल्ह्यातील येवला, दिंडोरी, नांदगावसह बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथे करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे तीन करोनाबाधित रुग्णांची दुसरी चाचणीही बाधित आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आज दिवसभराच्या वाढलेल्या आकड्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ६४६ वर पोहोचली आहे. तर एकट्या मालेगावातील बाधितांचा आकडा ५१२ वर पोहोचला आहे.

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या ७२ अहवालात ५९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ११ अहवाल बाधित आढळून आले आहेत. यामध्ये दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील दोघे तर निळवंडी गावातील रुग्णाचा समावेश आहे. मनमाडमध्येही एक ५५ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे.

तसेच येवला तालुक्यातील पाटोदा गावातील दोघे, गंगा दरवाजा परिसरातील एक तर साईराम कॉलनीतील तिघांचा समावेश आहे. सटाणा शहरात फुलेनगर येथील एका पोलीस कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली असतानाच आज तालुक्यातील विंचूर प्रकाशा महामार्गावरील ताहाराबाद शहरात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. तसेच आज आलेल्या दोन्ही अहवालात दोन करोनाबाधित रुग्णांची दुसरी चाचणी बाधित आढळून आली आहे.

येवल्यातील चिंता वाढली

गेल्या पाच दिवसापासून येवलेकरांना दिलासा मिळाला असतानाच आज नव्याने ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येवल्याची करोना बधितांची संख्या आता ३१ वर पोहोचली आहे. त्यामुळे येवलेकरांना मोठा झटका बसला आहे.  आज नाशिक जिल्ह्यातील ११ अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात येवले तालुक्यातील पाटोदा येथील २ करोना बाधित पुरुष रुग्ण आहेत, तर शहरातील बदापुर रोड लगत असलेल्या ओम साईराम वसाहतीतील ३ रुग्ण असून त्यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. तर शहरातील गंगा दरवाजा भागातील एका महिलेचा समावेश आहे.

बागलाण तालुक्यात शिरकाव 

मालेगाव करोनाचा हॉटस्पॉट ठरल्यानंतर हळूहळू करोनाने पंचक्रोशीत शिरकाव केलेला दिसून येत आहे. सटाणा शहरातील फुले नगर येथील पोलीस कर्मचाऱ्याला मालेगावी कर्तव्यावर असताना करोनाची बाधा झाली होती. यामुळे शहरात आधीपासूनच चिंता व्यक्त केली जात असताना करोनाने आता तालुक्यातील ताहाराबाद येथेही शिरकाव केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बागलाण वासियांच्या चिंतेत भर पडली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *