करोनामुक्तीसाठी मालेगाव शहरात ‘अकरा मोबाईल व्हॅन’; काय आहे संकल्पना? जाणून घ्या

करोनामुक्तीसाठी मालेगाव शहरात ‘अकरा मोबाईल व्हॅन’; काय आहे संकल्पना? जाणून घ्या

मालेगाव | नॉन कोविड रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’, या संकल्पनेतून मालेगावकराच्या सेवेत एकाचवेळी अकरा मोबाईल व्हॅन दाखल झाल्या आहेत.

या व्हॅनच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात जावून तेथील रुग्णांची त्याच ठिकाणी मोफत तपासणी व औषधोपचार करणार आहेत.

या तपासणी मोहिमेत सारी व कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर प्रथमोपचार करुन त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याने, या अकरा मोबाईल व्हॅन कोरोनामुक्त मालेगाव करण्यात नक्कीच खारीचा वाटा उचलतील असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केला.

भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स, महाराष्ट्र शासन, महानगरपालिका व सर्व डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विश्रामगृह, मालेगाव येथे ‘डॉक्टर आपल्या दारी’ या मोहिमेचा शुभारंभ मंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महापौर ताहेरा शेख, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक डॉ.पंकज आशिया, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे, पोलिस अधिक्षक (ग्रामीण) डॉ.आरंती सिंग, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलिस अधिक्षक संदिप घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, महानगरपालिकेचे आयुक्त  दिपक कासार, उपायुक्त (प्रशासन) नितीन कापडणीस, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, तहसिलदार चंद्रजीत राजपूत, शिवकुमार आवळकंठे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मंत्री भुसे म्हणाले, मोबाईल व्हॅनची गरज ओळखून जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून ही सेवा मालेगावकराच्या सेवेत दाखल झाली आहे. प्रत्येक व्हॅनचे रिपोर्टींग होणार असल्याने कोणकोणत्या भागात व किती रुग्णांवर उपचार करण्यात आले, याचा अहवालही मिळणार आहे. यामध्ये सारी व कोरोना या आजारांची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवरही लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले.

शहरातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी चांगला उपक्रम : राजाराम माने

यावेळी बोलतांना विभागीय आयुक्त श्री.माने म्हणाले, शहरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेत दाखल होणाऱ्या मोबाईल व्हॅन मुळे कोरोना आणि नॉन कोरोना रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी या व्हॅन्सचा नक्कीच उपयोग होईल,  असा विश्वास विभागीय आयुक्त श्री.माने यांनी यावेळी व्यक्त केला.

 कोविड व नॉन कोविड अशी दुहेरी आरोग्य सेवा या माध्यमातून उपलब्ध होणार : सूरज मांढरे

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, मालेगाव मध्ये काम करतांना एकीकडे कोरोनाशी लढा सुरु असतांना नॉन कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. खाजगी डॉक्टरांची सुविधाही तोकडी पडत असल्याचे लक्षात आल्यावर बाहेरुन मदत घेणे गरजेचे होते. त्यामुळे भारतीय जैन संघटनेच्या शांतीलाल मुथा यांच्याशी चर्चा करुन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. त्यांच्यासोबत आम्ही देखील 108 रुग्णवहिकेच्या सेवेची मदत उपलब्ध करुन देणार आहोत. त्यामुळे कोविड व नॉन कोविड अशी दुहेरी आरोग्य सेवा या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याने यापुढे नॉन कोविड रुग्णांची हेळसांड होणार नाही. असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी सांगितले.

सर्वप्रथम विभागीय आयुक्त राजाराम माने व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मन्सुरा हॉस्पिटला भेट देवून पहाणी केली, त्यानंतर मालेगाव पश्चिम भागात उभारण्यात आलेल्या नवीन रुग्णालये व क्वारंटाईन सेंटरची पहाणी करण्यात आली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे व विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते पोलिस प्रशासनासह महानगरपालिका व इतर विभागांना सेवाभावी संस्थांच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com