करोनायोद्ध्यांनी जिंकलं; जिल्ह्यातील १०२ पोलीस करोनामुक्त

करोनायोद्ध्यांनी जिंकलं; जिल्ह्यातील १०२ पोलीस करोनामुक्त

नाशिक । प्रतिनिधी

मालेगाव करोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. जिल्ह्यातील अर्धी पोलीस यंत्रणा मालेगावी कार्यरत आहे. परिणामी करोनाची पोलीसांमध्ये लागन होण्याचे प्रमाणही वाढत असून हा आकडा 150 वर पोहचला आहे. असे असतानाही नागरीक सुरक्षित रहावे यासाठी जीवाची बाजी लावून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी करोनाशी लढा देत आहेत. त्यांच्या दुहेरी लढ्याला यश आले असून यातील 102 पोलीसांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा 850 पेक्षा अधिक झाला आहे. यातील एकट्या मालेगावात साडेसहाशे करोनाग्रस्त आहेत. यात मोठा आकडा तेथे सेवा देणार्‍या पोलीसांची आहे. मालेगावात करोना वाढीचा हा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा रस्त्यावर उभी आहे. संपुर्ण जिल्ह्यातील गावे सांळतानाच मालेगाव येथे करोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर मालेगाव येथे पोलीस दलाची संख्या वाढवण्यात आली आहे. सध्या मालेगाव येथे 1 हजार 400 पेक्षा अधीक पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत.

मालेगावात कार्यरत पोलीसांची तेथील मंगल कार्यालये ताब्यात घेऊन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना गटा गटाने या ठिकाणी राहावे लागत आहे. परंतु काळजी घेऊनही करोनाने पोलीसांनीही गाठले आहे.

मालेगावात एसआरपीएफच्या 6 कंपनी कार्यरत आहेत त्यांच्या कार्यपद्धतीनुसार हे सर्व जवान एकाच ठिकाणी राहणे, एकाच ठिकाणी खाने तसेच एकाच बसमधून प्रवास करत असतात. सामाजिक अंतर पाळले तरी सतत एकत्र राहण्यामुळे एसआरपीएफच्या जवानांमध्ये करोनाच लवकर फैलाव झाल्याचे सुत्रांनी सांगीतले. हीच परिस्थिती ग्रामिण पोलीस दलातील पोलीस कर्मचार्‍यांची आहे.

दरम्यान, पॉझिटिव्ह आलेले तसेच त्यांच्या सानिध्यातील पोलीस कर्मचार्‍यांची वरचेवर तपासणी करण्यात येत आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या सर्वांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर पुर्ण उपचाराअंती गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत यातील 102 पोलीसांनी करोनावर मात केली आहे. मालेगाव येथे कर्तव्य बजावताना करोनाची लागण झालेल्या बहूतांश पोलीसांनी करोनावर मात केली असून त्यांची संख्या वाढत असून लवकरच सर्व पोलीस करोनामुक्त होतील असा विश्वास पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी व्यक्त केला आहे.

एकजुटीने संकटावर मात

मालेगाव येथे करोनाचा वेग वाढत असला तरी नागरीकांच्या सुरक्षेसाठी पोलीसांना आपले कर्तव्य करावे लागत आहे. काहीही झाले तरी आमच्या कतृव्यापासून आम्ही बाजुला हटलो नाही. आम्ही सातत्याने सर्वत्र कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या भेटी घेऊन, त्यांना सुरक्षेची काळजी घेण्याबाबत सुचना देत आहोत. सुरक्षा साधनांचा पुरवठा सातत्याने सुरू आहे. करोनामुक्त झालेल्या पोलीसांचा आकडा वाढत असून आम्ही एकजुटीने त्यावर मात करण्यात यशस्वी होत आहोत.

– डॉ. आरती सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com