आजपासून बॉटनिकल गार्डनची ‘ती’ झाडे पुन्हा बोलणार

0
नवीन नाशिक | तांत्रिक बिघाडामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेला बॉटनिकल उद्यानातील बोलक्या झाडांचा लेझर शो आजपासून नियमित सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
रविवारी सायंकाळी त्याचा प्रायोगिक शो विना अडथळा संपन्न झाल्याने लेझर शोचे प्रदर्शन नियमित करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बॉटनिकल उद्यानातील बोलक्या झाडांची बोलती बंद झाल्याने दर्शकांचा हिरमोड होत होता. मात्र आता ही झाडे पुन्हा एकदा बोलू लागणार असल्याने पर्यटन व वनप्रेमींचा आनंद द्विगुणीत होणार आहे.

ऐन शालेय सुटीच्या काळात लहान-थोरांची गर्दी वाढलेली असतानाच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने बॉटनिकल गार्डनचे आकर्षण ठरलेला बोलक्या झाडांचा लेझर शो बंद पडला होता.

त्यावर तातडीने दुरूस्ती करण्यात आली असली तरी त्यात अनेक दिवस गेल्याने बॉटनिकलला भेट देणार्‍या दर्शकांचा भ्रमनिरास होत होता. त्याविषयी उघडपणे नाराजीही व्यक्त केली जात होती.

रविवारी सायंकाळी ७ वा. प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला. दुरूस्तीनंतर पहिल्यांदाच त्याची ट्रायल घेतली जात असल्याने यावेळी उद्यानात रविवारची सुटी घालवायला आलेल्या सगळ्यांनाच लेझर शोचे स्वतंत्र तिकिट न काढता प्रवेशिकेवरच शो दाखविण्यात आला.

त्यामुळे सर्व पर्यटकांसह बच्चेकंपनीला आजचा प्रायोगिक शो बोनस म्हणून बघायला मिळाला.

LEAVE A REPLY

*