चालू बसचे चाक निखळले; प्रवासी थोडक्यात बचावले

0

वीरगाव (वार्ताहर) – संगमनेर आगाराच्या संगमनेर-समशेरपूर (एमएच-14-बीटी-3522) या परिवहन खात्याच्या बसचे चाक गाडी रस्त्यावर चालू असताना निखळले. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानाने अपघात न झाल्याने प्रवासी थोडक्यात बचावले.

ही बस काल (शनिवारी) सकाळी 10 च्या दरम्यान संगमनेरवरुन वीरगावमार्गे समशेरपूरकडे निघाली होती. 10.30 वा. गणोरे हद्दीत आली असताना चाकाचे नट तुटल्याने चालू बसचे डाव्या बाजूचे मागचे चाक निखळून 100 फुटांपर्यंत पाठीमागे घरंगळत गेले. दुसरेही चाक निखळण्याच्या बेतात असताना बसच्या हेलकाव्यामुळे चालकाने गाडी थांबविली.

रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हेलकावे बसत असतील अशी चालकाला अगोदर शंका आली. बस पुन्हा सुरु करताना ती चालू होईना म्हणून चालक खाली उतरल्यानंतर खरा प्रकार लक्षात आला. अन्यथा, दूसरेही चाक निखळून अपघात घडला असता. यावेळी बसमध्ये 15 प्रवासी असल्याची माहिती मिळाली. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.

गणोरे ते वीरगाव फाटा हा रस्ता पूर्ण खराब झाला आहे.सलगपणे रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. 6 किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी 45 मिनिटे लागतात. या रस्त्यावर अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत.नागरिकांनी वारंवार मागणी करुनही अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता तीव्र आंदोलन उभारावे लागेल.
-चंद्रशेखर आंबरे, (चेअरमन, विवेकानंद पतसंस्था)

LEAVE A REPLY

*