कायम कर्मचार्‍यांच्याही बदल्या होणार

0

शिर्डी संस्थानचा निर्णय, वर्षानुवर्षे एकाच जागी असणार्‍यांचे धाबे दणाणले

शिर्डी (प्रतिनिधी)- साई संस्थानमध्ये वर्षानुवर्षे एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या कंत्राटी कामगारांच्या बदल्यांनी वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वच कंत्राटी कामगारांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. गेल्या दोन दिवसांत तीनशेहून अधिक कामगारांचे बदली आदेश निघाले आहेत. यानंतर संस्थानातील कायम कर्मचार्‍यांनाही बदल्यांना सामोरे जावे लागणार आहे.

जे कामगार बदलीच्या ठिकाणी हजर होणार नाहीत त्या ठिकाणी तात्काळ दुसरे कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी कामगार पुरवणार्‍या एजन्सीला दिले आहेत. त्यातच राजाश्रयामुळे वर्षानुवर्षे एकाच जागी काम करणार्‍या कामगारांतील काहींनी दर्शनाचा बाजार मांडला होता. त्यामुळे भाविक व ग्रामस्थही नाराज होते. आता आयएएस अधिकारी रूबल अग्रवाल यांच्या ठाम भूमिकेने प्रथमच जुने बुरूज ढासळत आहेत. सर्वसामान्यांच्या मनाचा कल ओळखून राजकीय नेत्यांनीही बदल्यांमध्ये हस्तक्षेपास नकार दिला आहे. एरवी साध्या कंत्राटी कामगारांची बदली तर दूर त्याचे ड्युटीचे ठिकाण बदलले तरी मुंबई, दिल्लीतून फोन येण्याचा अनुभव अनेक अधिकार्‍यांनी घेतला. यावेळी मात्र शेकडो कर्मचार्‍यांची बदली सत्र सुरू असतानाही राजकीय पातळीवर सामसूम आहे. उलट अनेकांनी संस्थान अधिकार्‍यांचे कौतुक केले आहे.

यामुळे राजाश्रयाच्या बळावर दर्शनाचा बाजार मांडणार्‍या कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. संस्थानात प्रामाणिक काम करणार्‍या कंत्राटी कामगारांची संख्या मोठी आहे. मात्र काही मोजक्या कामगारांच्या कर्तबगारीमुळे काही विभाग बदनाम झाले आहेत. अनेक विभागातील विभाग प्रमुखही काही कामगारांच्या दबावाखाली वावरत असत. त्यामुळे भाविकांनी तक्रार करूनही या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे धाडस ते दाखवत नसत. प्रसादालय, हॉस्पिटल येथील कर्मचार्‍यांना संरक्षण विभागात बदली झाल्याने ते खूश आहेत. तर वर्षानुवर्षे संरक्षण विभागात काम करणारे काही मुजोर व काम चुकार कर्मचारी अन्य विभागात जाण्यास नाखुष आहेत.

साईबाबा संस्थानमधील कायम कर्मचार्‍यांची पाच वर्षांतून एकदा खातेनिहाय बदली करण्यात येते. मात्र संस्थानकडे कंत्राटी पध्दतीवर भरती झालेले 2200 कर्मचारी आहेत. त्यांच्या नेमणुका राजकीय वरदहस्तांकरवी झाल्याने गेल्या आठ-दहा वर्षांपासून या कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याचे धाडस संस्थान प्रशासनाने दाखवले नव्हते. साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर आएएस अधिकारी रूबल अग्रवाल यांनी संस्थान कर्मचार्‍यांना शिस्त लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना चांगले यश येत आहे. प्रशासन दुरुस्त करण्यासाठी व कामचुकार कर्मचार्‍यांना वेसन घालण्यासाठी त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे.

LEAVE A REPLY

*