Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

रेल्वे भुयारी पुलाखाली महिन्यापासून 15 फूट पाणी

Share

ठेकेदाराचा हलगर्जीपणा; जळगाव-गोंडेगावची दळणवळण व्यवस्था विस्कळीत

पुणतांबा (वार्ताहर)- राहाता व श्रीरामपूर या दोन तालुक्यांना जोडणार्‍या जळगाव-गोंडेगाव दरम्यान नव्याने तयार केलेल्या भुयारी पुलाखाली ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सुमारे महिन्यापासून 15 फूट पाणी असल्यामुळे या मार्गावरील दळणवळण विस्कळीत झाले आहे.  दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर सध्या रेल्वे खात्याच्या ध्येयधोरणानुसार रेल्वे फाटकाच्या ठिकाणी भुयारी पुलाची कामे ठिकठिकाणी प्रगतिपथावर आहेत. त्यानुसार राहाता तालुक्यातील जळगाव व श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव या गावांना जोडणार्‍या रस्त्यावरील रेल्वे चौकीवर चार महिन्यांपासून भुयारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या भुयारी पुलाच्या बाजूच्या भिंतीचे काम सुरू आहे.

भुयारी पुलाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्यामुळे रेल्वे खात्याने जळगाव चौकी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण भुयारी पुलाखालून जळगाव-गोंडेगाव रस्त्यावरून दुचाकी व लहान चारचाकी तसेच ट्रॅक्टरमार्फत दळणवळण सुरू होते. त्यामुळे या दोन्ही गावांतील ग्रामस्थांना गेट बंद होऊनही संपर्क व्यवस्थेबाबत फारशा अडचणी आलेल्या नव्हत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून परिसरात अधूनमधून होणार्‍या पावसामुळे या भुयारी पुलाखाली 12 फुटापेक्षा जास्त खोल पाणी जमा झाल्यामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थांचे दळणवळण विस्कळीत झाले आहे.

ग्रामस्थांना पुणतांबा किंवा चितळी मार्गे संपर्क करावा लागत असल्यामुळे अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. केवळ काम करणार्‍या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी व या मार्गावर प्रवास करणारे दुचाकीधारक वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे भुयारी पुलाची खोली आठ मीटरपर्यंत आहे. त्यामुळे गोळा होणार्‍या पाण्यासाठी जवळच विहिरीची व्यवस्था करून त्यातून पाण्याचा उपसा होऊन भुयारी मार्ग सुरळीत सुरू राहील अशी व्यवस्था केलेली आहे. जळगाव चौकी येथील भुयारी पुलाच्या ठिकाणी अशी व्यवस्था आहे. मात्र काम अपूर्ण असल्यामुळे ठेकेदाराने पुलाखाली जमा होणार्‍या पाण्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे.

मात्र ठेकेदाराने या प्रश्नाकडे गांभीर्याने न बघितल्यामुळे तसेच रेल्वे चौकी बंद केल्यामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. विशेष म्हणजे सध्या चितळी रेल्वे स्टेशनजवळही भुयारी पुलाचे काम सुरू आहे. या कामाच्या बांधकामासाठी पाण्याचे टँकर या पुलाखाली जमा झालेल्या पाण्यातून भरले जातात. मात्र पाण्याचा उपसा करून वाहतुकीसाठी पूल सुरू करण्याकडे ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याबद्दल दोन्ही गावांतील ग्रामस्थांत तीव्र असंतोष आहे. याबाबत रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या प्रबंधकाने या प्रश्नात लक्ष घालावे व ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी येथील संदीप वहाडणे, वैभव डोखे, बाळासाहेब जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी केली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!