श्रीरामपूर-परळी रेल्वेमार्गाचा सर्व्हे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करणार

0

कुकाणा (वार्ताहर)- श्रीरामपूर- परळी रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम प्रगतिपथावर असून फेब्रुवारी 2018 पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करून श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, गेवराई, बीड मार्गे परळी या रेल्वे मार्गास मंजुरी दिली जाईल असे आश्‍वासन रेल्वे मंत्रालयाचे शासकीय अधिकारी तथा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे स्वीय सहायक विजय पिंगळे यांनी खासदार सदाशिव लोखंडे व शिष्टमंडळाला दिले.

खा. लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेची बैठक दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीत रेल्वेमंत्र्यांचे स्वीय सहायक विजय पिंगळे व अन्य अधिकारी उपस्थित होते. बेलापूर (श्रीरामपूर)-परळी या मार्गाचा सर्व्हे श्रीरामपूर-नेवासा -शेवगाव-गेवराई-बीड-परळी असा होणे अपेक्षित असताना तो शेवगावपासून पाथर्डी-राजुरी -रायमोहमार्गे बीड असा करण्यात आला होता. हा चुकीचा केलेला सर्व्हेमार्ग डोंगराळ भागातून जात असल्याने न परवडणारा असल्याचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला होता. या विरोधात सेवा संस्थेने हरकत घेऊन 4 जुलै रोजी सोलापूर विभागीय कार्यालयासमोर उपोषण केले होते. यासंदर्भात खा.लोखंडे यांनी दिल्लीत रेल्वेभवन येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीत खा. लोखंडे, सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी, निसार सय्यद, यशवंत एरंडे, गणेश मोढवे, शिवाजी दिशागत आदी उपस्थित होते.

बैठकीत श्री. पिंगळे यांनी फेब्रुवारीच्या अगोदर सर्व्हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तसेच सर्व्हे पूर्ण होताच या मार्गाला मंजुरी देऊन तातडीने हा मार्ग पूर्ण करणार असल्याचे आश्‍वासन खा. लोखंडेंसह शिष्टमंडळाला दिले. यावेळी नगर जिल्ह्यात रेल्वेचे जाळे नसल्याची खंत पिंगळे यांनी व्यक्त केली. बैठकीसाठी या मार्गाचे सर्वेक्षण करणारे अधिकारी श्री. खरे व अन्य सहकारी उपस्थित होते. या रेल्वे मार्गासंबंधी काही महत्त्वाच्या कागदपत्रांच्या प्रती पिंगळे यांनी सेवा संस्थेच्या पदधिकार्‍यांकडून घेतल्या. तसेच हा मार्ग तातडीने सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन खा. लोखंडे व सेवा संस्थेच्यावतीने देण्यात आले. नुकतेच रेल्वे मंत्र्यांच्या शिर्डी दौर्‍यात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीदेखील या मार्गाच्या मागणीचे निवेदन तसेच विभागीय रेल्वे अधिकारी सोलापूर यांच्याकडे कार्यवाहीच्या मागणीचे निवेदन दिले आहे.

गेल्या 2 पिढ्यांपासून श्रीरामपूर-परळी रेल्वे मार्ग प्रलंबित आहे. या मार्गासाठी मी व खासदार दिलीप गांधी एकत्र येऊन तातडीने हा प्रश्‍न मार्गी लावून जनतेचे स्वप्न साकार करणार आहोत.
-सदाशिव लोखंडे (खासदार)

LEAVE A REPLY

*