Sunday, April 28, 2024
Homeनगरवाहतूक नियमांच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

वाहतूक नियमांच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

श्रीरामपूर वाहतूक पोलिसांकडून लक्ष्य पूर्ण करण्यासाठी वाहनधारकांची लूट

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – जिल्हा होण्यासाठी विविध कार्यालये, सुसज्ज सुविधा असलेल्या श्रीरामपूर शहरामध्ये दोन वर्षांपूर्वी वाहतूक शाखेचे कार्यालय सुरू करण्यात आले. शहरातील वाहतुकीची बिघडलेली शिस्त लावण्याचे मोठे आव्हान वाहतूक नियत्रंण विभागासमोर होते. काही अंशी शिस्त लागली देखील, मात्र वरिष्ठांकडून टारगेटच्या नावाखाली ऑनलाईन ई-चलनाऐवजी ट्रॅफिक पोलीस ‘तडजोडी’वर जास्त जोर देत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

- Advertisement -

दोन वर्षांपूर्वी श्रीरामपूर येथे जिल्हा वाहतूक शाखेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. शहरात सुरू असलेल्या काळी-पिवळ्या वाहन चालकांसह बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. यामध्ये सुरुवातीला बर्‍याच वाहनचालकांना दंड होत गेल्याने काही प्रमाणात शिस्त लागली. मात्र, दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहनांची वर्दळ, शहरातून सुसाट चालणार्‍या दुचाकी, बेकायदेशीरपणे चालणारी प्रवासी वाहतूक यामुळे वाहतुकीला लागलेली शिस्त बिघडली आहे.

शहरामध्ये शिवाजी चौक, मेनरोड व शिवाजीरोड सह बसस्टँड, संगमनेर-नेवासा रोड व बेलापूर रोडवर मोठी बाजारपेठ आहे. त्याठिकाणी वाहने लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यातच व्यावसायिकांनी लावलेले बोर्ड रस्त्यावर आले आहेत. त्याच्या आसपास मोटारसायकल लावल्या जात आहेत, त्यामध्ये फळे विकणारी हातगाडी देखील मोठ्या प्रमाणात असतात, मोटारसायकल ज्या ठिकाणी पार्क होतात, त्या बाजूलाच नगरपालिकेच्या व वाहतूक नियत्रंक पांढरा पट्टा असल्याने साहजिकच चारचाकी वाहने पट्यालगत लावावी लागतात. वाहतूक शाखा पांढर्‍या रेषेच्या बाहेर असल्या कारणाने ई-चलन काढते. त्यामुळे चारचाकी वाहनधारकांनी वाहन घरी लावून बाजारपेठेत यायचे का? असा सवाल करत आहे.

वाहतूक नियत्रंक शाखेकडे एक एपीआय असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 19 कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्येक कर्मचार्‍याला नेमणूक केलेल्या ठिकाणी विशिष्ट पावती करण्याचे उद्दिष्ट दिले असल्याचे कर्मचार्‍यांच्या अंतर्गंत गोटातून समजते. तसेच हे टारगेट पुर्ण करण्यासाठी शिट बेल्ट, गाडीचे टायर पांढरा पट्ट्याच्या थोडे जरी बाहेर असले तरी दंड केला जात आहे.

श्रीरामपूर शहरातून अनेक परराज्यातील वाहनांची आवक-जावक सुरू असते. या वाहनांसह विनापरवाना चालणार्‍या टॅक्सी, रिक्षा, अ‍ॅपे, काळी-पिवळी जीप यांच्यासह इतर अनेक वाहनांच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचे समजते. त्यामुळे ग्रामीण भागातून येणार्‍या वाहन धारकांना वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून टारगेट केले जात असल्याच्या तक्रारी होत आहे.

विनापरवाना चालणार्‍या वाहनांवर कारवाई होत नाही. अनेक काळी-पिवळी वाहन चालक भंगारमधून गाड्या घेऊन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून अनधिकृत वाहतूक करतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, या अनधिकृत वाहन चालकांकडून मोठी देवाणघेवाण होत असल्याने अशा वाहन चालकांवर कारवाई होत नाही. कायदा सर्वांना समान आहे, पोलिसांची नेमणूक ठिकाणी चार्ट लावण्यात यावा, कारण अनेक पोलीस नेमणूक ठिकाण सोडून लग्न समारंभ असणार्‍या भागात जास्त असतात, कारण या ठिकाणच्या मोठ्या वर्दळीमुळे मोठी चिरीमिरी मिळत असते.
-बाबासाहेब शिंदे, मनसे जिल्हाध्यक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या