Type to search

अर्थदूत ब्लॉग

Blog : व्यापारयुध्द : भारताला संधी

Share

अ‍ॅमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या व्यापार युद्धाच्या धोक्यापासून भारताला वाचवणे हे नव्या सरकारपुढे आव्हान असणार आहे. एकीकडे अमेरिकेने आयात शुल्क वाढविल्यामुळे चीन आपली उत्पादने भारतीय बाजारात पाठविण्यासाठी आसुसलेला आहे. दुसरीकडे अमेरिका देखील भारतातील उत्पादनावर आयात शुल्क आकारून भारताला व्यापार युद्धात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत नव्या सरकारला या व्यापार युद्धाच्या संकटापासून वाचवण्यासाठी रणनिती तयार करावी लागणार आहे. यासंदर्भात एक अभ्यास अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात म्हटल्यानुसार, 2019-20 मध्ये अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे दोन्ही देशात भारतातून निर्यात 3.5 टक्क्यांनी वाढेल,अशी शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेने चीनच्या उत्पादनावर आयात शुल्क आकारण्यास सुरुवात केली आणि या व्यापार युद्धाला प्रारंभ केला. प्रत्युत्तरादाखल चीनने देखील अमेरिकेच्या वस्तुंवर आयात शुल्क आकारण्यास सुरवात केली. या व्यापार युद्धामुळे होणारी संभाव्य हानी लक्षात घेऊन अमेरिका आणि चीनने हे व्यापारी युद्ध टाळण्यासाठी 24 ऑगस्ट 2018 पासून सतत चर्चा केली. मात्र कोणताही तोडगा निघाला नाही.

चर्चा निष्फळ ठरल्याने अमेरिकेने 10 मे पासून चीनकडून आयात केल्या जाणार्‍या 200 अब्ज डॉलर्स मूल्यांच्या वस्तूंवरील सध्याचे आयात शुल्क दहा टक्क्यावरून वाढवून 25 टक्के केले. त्यामुळे चीनही गप्प बसला नाही. चीनही 1 जूनपासून अमेरिकेतून आयात होणार्‍या 60 अब्ज डॉलर मूल्यांच्या 5140 वस्तूंवरील आयात शुल्क 25 टक्के करण्यात येणार आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध हे नियंत्रित अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही. मात्र भारताला या परिस्थितीचा लाभ घेऊन निर्यात वाढवण्यासाठी रणनिती आखायला हवी. यातून देशातील व्यापारी तूट कमी होण्यास हातभार लागू शकेल. विदेशी बाजार तज्ञांच्या मते, चीनने अमेरिकी सामानाची आवक कमी केल्यास भारत चीनला सुमारे 100 वस्तूंची निर्यात करू शकतो. त्यात तंबाखू, द्राक्षे, रबर, डिंक, ल्युब्रिकंटस, सोयाबीन, तेल अलॉय स्टील, कापूस, बदाम, अक्रोड, कृषी उत्पादने, विविध रासायनिक पदार्थ आदींचा समावेश आहे. आजघडीला भारत संत्री, बदाम, अक्रोड, गहू आणि मका याची निर्यात करत आहे; पण ही निर्यात चीनला करत नाहीये.

चीन या वस्तू अमेरिकेकडून खरेदी करत आहे. एप्रिल 2019 मध्ये द्विपक्षीय व्यापारात तोटा कमी करण्यासाठी भारताने 380 वस्तूंची यादी चीनला पाठविली आहे. त्यात निर्यात वाढवता येणे शक्य आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यामध्ये प्रामुख्याने वस्त्र, रसायन, औषधी क्षेत्रातील उत्पादन यांचा समावेश आहे. अमेरिकेला ऑटो स्पेअरपार्टचा पुरवठा करणारा चीन हा मेक्सिकोनंतरचा दुसरा मोठा देश आहे. तथापि, काही अमेरिकी कंपन्या भारताकडून या वस्तू खरेदी करण्याबाबत उत्सुकता दाखवित आहेत. त्यामुळे भारताला अमेरिकेत निर्यात करण्यासाठी अनेक नवीन संधी दिसत आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार वाढवताना उभयातील मतभेद दूर करणे गरजेचे आहे. यासाठी भारताने कौतुकास्पद कुटनीती आखत आयात केल्या जाणार्‍या बदाम, अक्रोड, दाळीसह 29 वस्तुंवर आगावू शुल्क आकारण्याची कालमर्यादा वाढविली असून ती मर्यादा 16 जून 2019 पर्यंत पुढे ढकलली आहे. अशा स्थितीत भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी तणाव कमी करण्यासाठी व्यापारी पातळीवरील चर्चा पुढे नेणे गरजेचे आहे. अशी कृती झाल्यास ट्रेड वॉरचा लाभ घेत भारत अमेरिकेला नव्या उमेदीने निर्यातीत वाढ करेल. नव्या सरकारला अमेरिका आणि चीन यांच्या व्यापार युद्धापासून भारताला वाचवण्याचे काम करावे लागणार असून त्याचबरोबर अमेरिका आणि चीनला निर्यात वाढविण्यासाठी अचूक रणनिती आखावी लागणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाचे पडसाद जगभरातील अर्थव्यवस्थेवर पडत आहेत. यापासून भारतही दूर राहिलेला नाही. व्यापार युद्धामुळे भारतीय शेअरबाजारावर नकारात्मक परिणाम होताना दिसून आले आहेत. तथापि, महासत्तांमधील हे व्यापारयुद्ध भारतासाठी निर्यात वाढविण्यासाठी संधी देखील मानता येईल. दोघांच्या भांडणाचा ङ्गायदा तिसर्‍याला मिळतो, हे आपण लहांनपणापासून ऐकत आलो आहोत. हीच मात्रा इथेही लागू पडते.

सध्याच्या काळात चीन हा भारतीय उत्पादनासाठी तिसरी मोठी बाजारपेठ आहे. त्याचवेळी चीन भारताकडून वस्तूंची सर्वाधिक आयात करते. उभय देशात 2001-2002 मध्ये आपापसातील व्यापार केवळ 3 अब्ज डॉलर होता. तो 2018-19 मध्ये 88 अब्ज डॉलरवर पोचला आहे. अशा स्थितीत अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धादरम्यान भारताने संधी साधून निर्यात वाढविली तर व्यापारी तूट कमी होऊ शकतो. आज व्यापार युद्धाच्या आघाडीवर अमेरिकेचा सामना करण्यासाठी भारताला आपल्या बाजूने ओढण्याचा चीन प्रयत्न करताना दिसून येतो. याप्रमाणे चीनी उत्पादनावर आकारलेल्या आयात शुल्कसंबंधी निर्बंधांमुळे अमेरिकेत चीनी उत्पादनाचा ओघ कमी राहिल. अशा वेळी भारत अमेरिकेत मशिनरी, इलेक्ट्रिकल उपकरण, रबर यासारख्या उत्पादनाची मोठ्या प्रमाणात निर्यात करू शकतो. भारत अमेरिकेला टेक्सटाइल, गारमेंट आणि जेम्स ज्वेलरीची निर्यात वाढवू शकतो. 

-प्रतिनीधी

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!