टॅक्ट्ररचलीत औजारांसाठी 14 हजार प्रस्ताव

0
लाभार्थीची ड्रॉ पध्दतीने होणार निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानातंर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियानातंर्गत विविध प्रकारचे टॅक्टरचलीत औजारे खरेदीवर अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातून 14 हजार 368 प्रस्ताव कृषी विभागाला प्राप्त झाले असून सोडत पध्दतीने आलेल्या प्रस्तावातून पात्र लाभार्थीयांची निवड केली जाणार आहे.तालुकानिहाय सोडत पध्दतीने प्रक्रिया राबवण्यात येणार असून यामध्ये कोण नशिबवान ठरणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
उन्नत शेती-समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत प्राप्त अर्जामधून ड्रॉ पध्दतीने शेतकर्‍यांची सेवा जेष्ठतेनूसार क्रमवारी निश्‍चित करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 13 मे 2017 पर्यंत इच्छुक लाभार्थी शेतकर्‍यांनी संबधीत कृषी सहाय्यकामार्फत मंडळ कृषी अधिकार्‍यांकडे अर्ज केले होते. उन्नत शेती- समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत सुरु असलेल्या या योजनेत शेतकर्‍यांना अर्ज करण्यासाठी 19 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. केंद्र व राज्य शासनाच्या अधिकृत तपासणी संस्थांनी यंत्र व अवजाराचे परिक्षण करुन ते सक्षम संस्थाच्या निश्‍चित प्रमाणकानुसार निकष पुर्ण केलेले अपेक्षित आहे.
याच अवजारांची शेतकर्‍यांना खुल्या बाजारातून टॅक्टर व इतर अवजारांची खरेदी करावी लागणार आहे. रोखीने खरेदी न करता बँकेच्या खात्यावरुन रक्कम देणे अपेक्षीत आहे. खरेदीसाठी पूर्वसंमती आवश्यक आहे. अनुदानासाठी देयक अदा केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांची पूर्वसंमती आवश्यक आहे. त्यानंतरच खरेदी करता येणार आहे. जिल्ह्याला मिळणार्‍या टॅ्रक्टरसह यंत्र व अवजार वाटपाच्या 40 टक्के निधी ट्रॅक्टर खरेदी करणार्‍या लाभार्थीयांसाठी तर, उर्वरीत 60 टक्के निधी कृषी यंत्र व अवजारांसाठी खर्च करण्यात येणार आहे.

या अवजारांसाठी मिळणार अनुदान
टॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टरचलीत नांगर, रोटाव्हेटर, पेरणीयंत्र, भात लावणीयंत्र, रिपर कम बाईंडर, मळणीयंत्र, (डी-स्टोनर,पॉलीशिंग,ग्रेडींग, पॅकींग)कल्टिव्हेटर, मिनीभात मिल, दालमील, पुरकयंत्र संच, पा टॅ्रक्टरचलीत फवारणी यंत्र, मिस्ट ब्लोअर, सब सॉयलर, प्रक्रिया संयत्रे, कापूस पर्‍हाटी श्रेडर, ऊस पाचट कुट्टी, मल्चर आदी अवजारे अनुदानावर मिळणार आहे.

जिल्ह्यासाठी 5 कोटी रुपये
कृषी यांत्रिकीकरणाकरीता विविध योजनेतंर्गत प्राप्त होणार्‍या निधीच्या मर्यादेत लाभार्थीयांची निवड करणे अपेक्षित आहे. मात्र, नगर जिल्ह्यासाठी किती लाभार्थीयांची निवड करण्यात यावी याची उदिष्ट प्राप्त नाही. त्यामूळे सदर निवड ही सध्या आर्थिक लक्षांकानुसारच करण्यात येणार आहे. त्यानूसार लाभार्थीयांना पूर्वसमंती देण्यात येण्याची शक्यता आहे. 15 टक्के अनूसुचित जाती, 8 टक्के अनूसुचित जमाती व इतर खुल्या प्रवर्गासाठी अनूदान देण्यात येणार आहे.

तालुकानिहाय सोडत तारीख व ठिकाण
अर्जदार शेतकर्‍यांच्या समक्ष तालुकानिहाय सोडतपध्दतीने निवड करण्यात येणार आहे. भौतिक आर्थिक लक्षांकानुसार जेष्ठता क्रमवारीनूसार पात्र लाभार्थीयांची निवड करण्यात येणार आहे.
तालुकानिहाय सोडत तारीख व ठिकाण
20 जून नगर ः साई आनंद मंगल कार्यालय.
कर्जत ः शिवपार्वती मंगल कार्यालय.
शेवगाव ः पंचायत समिती सभागृह.
कोपरगाव ः प्रशासकीय इमारत सभागृह.
21 जून पारनेर ः डॉ. आंबेडकर भवन, नगरपालिका.
श्रीरामपूर ः कृषी चिकीत्सालय, गोंधवणी फार्म.
अकोले ः के. बी दादा सभागृह, अगस्ती विद्यालय.
22 जून संगमनेर ः यशवंतराव चव्हाण प्रशासकीय इमारत.
श्रीगोंदा ः तालुका कृषी अधिकारी कार्यालय.
पाथर्डी ः तालुका बीजगूणन केंद्र.
23 जून जामखेड ःतालुका कृषी अधिकारी कार्यालय.
राहुरी ः पंचायत समिती सभागृह.
राहाता ः प्रशासकीय इमारत सभागृह
या ठिकाणी सकाळी 11 वाजता सोडत पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अर्जदार शेतकर्‍यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक पंडित लोणारे यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*