ट्रॅक्टरच्या धडकेने चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

0

राजूर (वार्ताहर) – शेतात हरभरा पेरणीच्यावेळी एका चार वर्षे वयाच्या चिमुरड्याचा ट्रॅकटरची धडक बसून मृत्यू झाल्याची घटना शुुक्रवारी सायंंकाळच्या सुमारास राजूर येेथेे घडली. याबाबत राजूर पोलिसांत मुलाच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली असून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या शुक्रवार 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता राजूर गावातील शिवारात एलमामे यांच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे हरभरा पेरणी सुरू होती. त्यावेळी ट्रॅक्टर चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरद्वारे हरभर्‍याची पेरणी करीत असताना दुर्लक्ष केल्याने ट्रॅक्टरखाली लहान मुलगा युवराज राज गिरी (वय-4) सापडून तो मरण पावला. मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने मृत मुलाचे वडील राज भवन गिरी (राहणार नेपाळ, हल्ली राजूर) यांनी राजूर पोलिसांकडे चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे.

राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व शवविच्छेदन करून मुलाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र दोन दिवस उलटूनही आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. फिर्यादी हे नेपाळ मधून आले असून त्याचे कुटुंबीय एका शेतकर्‍याच्या शेतात राहत होते. रात्रीच्या वेळी राज भवन गिरी हे राजूर गावात गस्त घालून पहारा देण्याचे काम करीत असतात. एकूलता एक मुलगा गेल्याने त्यांचे कुटुंबीय दुःखात असून या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*