Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedदुसरी लाट ओसरली; राज्यातील पर्यटनस्थळे सुरू 

दुसरी लाट ओसरली; राज्यातील पर्यटनस्थळे सुरू 

औरंगाबाद – Aurangabad

पर्यटनस्थळे, वारसास्थळे बुधवारपासून सुरू करण्यास केंद्रीय पुरातत्व विभागाने परवानगी दिली आहे, त्यामुळे या विभागांतर्गत असलेली देशभरातील सर्व पर्यटनस्थळे, वारसास्थळे, वस्तुसंग्रहालये खुली होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यायचा असून प्रशासन हा निर्णय केव्हा घेणार याची प्रतीक्षा पर्यटकांसह पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना आहे.

- Advertisement -

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्रीय पुरातत्व विभागाने देशभरातील पर्यटनस्थळे, वारसास्थळे, वस्तुसंग्रहालय फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बंद केली होती. पर्यटकांना या ठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. देशातील करोना स्थितीचा आढावा घेऊन त्यात वाढ केली जात होती.

सर्व पर्यटनस्थळे, वारसास्थळे, वस्तुसंग्रहालये बंद ठेवण्याचे लेखी आदेश केंद्रीय पुरातत्व विभागाचे संचालक ए. के. पाठक यांनी काढले होते, आता त्यांनीच सोमवारी (१४ जून) सुधारित आदेश काढत बुधवारपासून (१६ जून) पर्यटनस्थळे, वारसास्थळे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. राज्य आणि जिल्हास्तरीय आपत्ती निवारण समितीच्या आदेशानुसार व मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

केंद्रीय पुरातत्व विभागाने वारसास्थळे खुली करण्यास परवानगी दिली असली तरी, स्थानिक प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन समिती त्याला परवानगी देणार का या बद्दल संभ्रम आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दीड ते दोन महिन्यांनी पर्यटन व वारसास्थळे खुली करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. डिसेंबर २०२० मध्ये ही स्थळे खुली करण्यात आली आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे फेब्रुवारी महिन्यात बंद करण्यात आली. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन या बद्दलचा निर्णय केव्हा घेणार याची प्रतीक्षा पर्यटकांना, पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या