Type to search

Featured सार्वमत

तौसिफ शेख कुटुंबियांना मदत देण्यास टाळाटाळ

Share

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन : आंदोलकांना उठविण्याचा प्रयत्न

अहमनगर (प्रतिनिधी) – दावल मलिक ट्रस्ट जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन केलेल्या तौसिफ हासिम शेख याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तसेच न्याय देण्यास जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत शेख कुटुंबीयांनी शनिवारपासून (दि.15) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत इच्छा मरणास परवानगी देण्याची मागणी केली आहे. मयत तौसिफ शेख यांचे वडील हासिम कलिंदर शेख, आई अनवर हासिम शेख, पत्नी फरीदा तौसिफ शेख व दोन लहान मुलींनी हे आंदोलन सुरू केले आहे. तौसिफ शेख यांनी कर्जत येथील दावल मलिक ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी दि. 20 डिसेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन केले होते. त्यामध्ये तौसिफ शेख यांचा मृत्यू झाला. त्यास पाच महिने होऊनही त्यांच्या कुटुंबियांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्री निधीतून मिळणार्‍या रकमेसाठी मयत तौसिफ शेख यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सर्व कागदपत्रे सादर केलेली होती. परंतु अद्याप मयताच्या वारसांना मुख्यमंत्री निधी मिळालेला नाही.

त्यामध्ये दोषी असलेले संबंधित अधिकारी व कर्मचारी व दावल मलिक ट्रस्टचे अध्यक्ष जहांगिर इब्राहिम शेख यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. मयत तौसिफ शेख यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत म्हणून 50 लाख रुपये मिळावेत. सदरील कुटुंबीयांना मदत मिळणेकामी वेळोवेळी कागदपत्रांची पुर्तता केली आहे. तरीही 5 महिने उलटून देखील शासकीय स्तरावरून कुठल्याही प्रकारची मदत झालेली नाही. कुटुंबीयांचे पुनर्वसन करून आपल्या विशेष अधिकारामधून त्यांच्या पत्नीस शासकीय नोकरी मिळावी. या मागण्या मान्य करता येत नसतील तर शेख कुटुंबाला इच्छा मरणास परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तौसिफ शेख याचे कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केल्यावर पोलिसांनी तेथे येऊन निवासी उपजिल्हाधिकार्‍यांकडचे आश्वासनाचे पत्र शेख कुटुंबियांना देत आंदोलकांना तेथून उठविले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक असून, ती संपेपर्यंत त्यांना प्रांताधिकारी कार्यालयाजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये बसा असे सांगत आंदोलकांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. धरणे आंदोलनाच्या ठिकाणी लावलेला बोर्डही काढून टाकला. त्यामुळे शेख कुटुंबाला अडगळीच्या ठिकाणी आंदोलनास बसावे लागले.

पित्याचा फोटोकडे चिमुकलीची धाव
मयत तौसिफ शेख याचे कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यास बसले असताना तौसिफच्या 2 लहान मुलीही तेथे होत्या. आंदोलन स्थळी आंदोलनाची माहिती देणारा फ्लेक्स बोर्ड लावण्यात आलेला होता. त्या बोर्डवरील मयत तौसिफ शेख याच्या फोटोकडे त्यांची तीन वर्षाची मुलगी खुशबू हिने धाव घेतली. फोटो वर हात फिरवत अब्बा कब आओगे असे म्हणत रडायला सुरुवात केली. हे दृश्य पाहून उपस्थितांना गहिवरून आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!