Friday, April 26, 2024
Homeनाशिकमनरेगा आढावा बैठकीत कृषीमंत्री भुसेंची नाराजी

मनरेगा आढावा बैठकीत कृषीमंत्री भुसेंची नाराजी

मालेगाव । प्रतिनिधी

मनरेगा( MGNREGA) अंतर्गत विकासकामांसाठी निधीची कमतरता नसतांना देखील संबंधित अधिकारी, सेवकांच्या नाकर्तेपणामुळे विकासकामांचा आलेख खालवला असल्याची स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करत कृषिमंत्री दादा भुसे ( Agriculture Minister Dada Bhuse) यांनी प्रलंबित कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी मनरेगाच्या कामांचा नियमित आढावा घेऊन महिन्याभरात प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश येथे बोलतांना दिले.

- Advertisement -

येथील शासकीय विश्रामगृहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने ( Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme )ची आढावा बैठक ना. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रोहयोचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे यांच्यासह मनरेगाचे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ( National Rural Employment Guarantee Scheme) सिंचन विहीरी, गाळ काढणे, रस्ते विकास, घरकुल योजना, शेततळे, फळबाग लागवड याविषयी चर्चा करण्यात येवून संबंधित कामाचा कृषिमंत्री भुसे यांनी आढावा घेतला. तालुक्यातील 2017-2018 ते आजपर्यंतच्या प्रलंबीत कामांचा देखील आढावा ना. भुसे यांनी घेत अधिकारी, सेवकांच्या नाकर्तेपणामुळेच सदरची कामे प्रलंबित राहत असल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. घरकुलाच्या मंजूर झालेल्या कामांना सुरूवात का झाली नाही असा प्रश्न उपस्थित करत गत तीन वर्षातील घरकुलांचा संख्यात्मक प्रगती अहवाल येत्या आठ दिवसात सादर करण्याच्या सुचना ना. भुसे यांनी दिल्या.

घरकुल योजनेतील गोरगरीब जनतेची कामे मार्गी न लागल्यामुळे सन 2019-2020 मधील प्रलंबित कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशा सुचना देतांना ना. भुसे म्हणाले. तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी नियमीतपणे प्रलंबित कामांचा आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणाचा तातडीने निपटारा करावा. तसेच मनरेगा अंतर्गत होणारी विकास कामे दर्जेदार पध्दतीने होत असल्याची खात्री करून तसा अहवाल सादर करण्याबाबतही त्यांनी सुचना केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या