ओबीसींच्या मागण्यांसाठी नगाव बारीजवळ रास्तारोको

jalgaon-digital
1 Min Read

निजामपूर – Nijampur – वार्ताहर :

ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात सर्व ओबीसी संघटनांना सोबत घेऊन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नेतृत्वात जिल्हातील ओबीसी संघटनांनी मिळून रास्तारोको, आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. अशी माहिती समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांनी दिली.

धुळे शहरालगत नगावबारी जवळ गुरुवार दि.17 जून रोजी 11 वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यातील पाच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण विरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 27 महानगरपालिकेच्या एकूण 2736 जागांमधून 740 जागा कमी होत आहेत.

128 नगरपंचायतीं व 241 नगरपालिकामधल्या 7493 जागांपैकी 2099 जागा कमी होणार आहेत. 34 जिल्हापरिषदेतील 2000 जागांपैकी 535 जागा तर 351 पंचायत समितीमध्ये 4000 जागांपैकी 1029 जागा कमी होणार आहेत 27,782 ग्रामपंचायतींमध्ये अंदाजे 1,90,691 जागांपैकी 51486 जागा ओबीसी समाजाच्या कमी होत आहे.

न्यायालयाच्या या निर्णयाचा कोणताही परिणाम हा नोकरी अथवा शैक्षणिक आरक्षणावर होणार नसला तरीही राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. याचा परिणाम फक्त राज्यावरच नाही तर देशात होणार आहे.

यामुळे आता सर्व ओबीसी संघटनांनी एकत्रित लढा देण्याची गरज आहे, यासाठीच होणार्‍या आंदोलनात सर्व ओबीसी संघटनांची उपस्थिती आवश्यक आहे असेही श्री.बागुल यांनी म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *