Friday, April 26, 2024
Homeनगरसहा महिन्यांपासून झेडपीच्या मुख्याध्यापक पदाची पदोन्नती रखडली

सहा महिन्यांपासून झेडपीच्या मुख्याध्यापक पदाची पदोन्नती रखडली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवरील मुख्याध्यापक पदाची पदोन्नतीची प्रक्रिया सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून रखडलेली आहे. जानेवारी 2020 मध्ये होणारी ही प्रक्रिया लांबल्याने आणि करोना संकट आल्यामुळे पात्र असताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील अध्यापकांची पदोन्नती लांबली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत. यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने गतवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी 1 हजारांहून अधिक शिक्षकांची पाच वर्षांचे गोपनीय अहवाल तपासले. ही प्रक्रिया करण्यास साधारण दोन महिन्यांचा कालावधी लागला.

दरम्यान डिसेंबर 2019 संपला आणि जानेवारीत पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय झाला. मात्र, त्यावेळी पुन्हा मुहूर्त टळला. पुढे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण विभागाने तपासलेले पाच वर्षांचे गोपनिय अहवाल पुन्हा तपासण्याचा निर्णय घेतला. यात पुन्हा दोन महिन्यांचा कालावधी गेला.

फेबु्रवारीनंतर पदोन्नतीची प्रक्रिया होईल, या आशेवर शिक्षक असताना मार्चमध्ये करोना आणि लॉकडाऊन आला. यामुळे पुढे चार ते पाच महिने काहीच हालचाल झालेली नाही. दरम्यान दिव्यांग शिक्षक संघटनेने मागणी केल्यामुळे या संवर्गातील अनुशेष भरण्याचा निर्णय झाला.

आता हा अनुशेष भरल्याशिवाय मुख्याध्यापक पदाची पदोन्नती होणार नाही. वेळेत या पदाची पदोन्नती झाली असती उपाध्यापक, अध्यापक पदावरील शिक्षकांना पुढील पदावर पदोन्नतीसाठी संधी मिळाली असती. यासह जास्तीजास्त शिक्षकांची सोय झाली असती.

दरम्यान याबाबत शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांच्याकडे विचारणा केली असता, आधी दिव्यांग शिक्षकांच्या पदोन्नतीचा अनुशेष भरल्यानंतर पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी दिव्यांग शिक्षकांचे रोष्टर तपासण्यात येणार असून हे काम जिल्हा पातळीवर करण्यात येणार असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेचे रोष्टर तपासून पूर्ण झाल्यावर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या