Friday, April 26, 2024
Homeनगरझेडपी पदाधिकार्‍यांच्या बंगल्यासाठी ‘घसारा’ निधी

झेडपी पदाधिकार्‍यांच्या बंगल्यासाठी ‘घसारा’ निधी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत लालटाकी येथील पदाधिकारी यांच्या निवासस्थानांचे बांधकाम घसारा निधीतून करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.

- Advertisement -

या कामासाठी सुरवातीला प्रत्येकी एका निवासस्थानासाठी एक कोटीचा खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु विशेष सभेत त्यावर चर्चा होऊन त्यामध्ये अध्यक्षांच्या बंगल्यासाठी एक कोटी तर इतर चार पदाधिकारी यांच्या बंगल्यासाठी 50 लाखाची तरतूद करण्यावर एक मत झाले.

यात चार पदाधिकारी यांच्या बंगल्याला जर निधीची गरज पडली तर तो उपलब्ध करून देण्यात येईल, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच घसारा निधीत 40 लाख जमा करण्याऐवजी 30 लाख जमा करण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा परिषदेची ऑनलाईन विशेष सभा पारपडली. यात अर्सेनिक अल्बम खरेदीचा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यच्या सूचना या सभेत देण्यात आलेल्या आहेत. एक कोटी 48 लाखाच्या गोळ्यांचे वाटप होणार आहे. दहिगाव ने येथील विकश्रामगृह नवीन बांधकामाचा विषय असताना कार्यकारी अभियंता यांनी तो दुरुस्तीचा म्हणून मांडला. त्यावर सदस्यांनी आक्षेप घेतला.

अखेर कार्यकारी अभियंत्यांची ही तांत्रिक चूक जिल्हा परिषद प्रशासनाने मान्य करीत हा विषय आगामी सभेत मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह राहाता येथील विश्रामगृहाचा विषयही पुढील सभेत विषय घेण्याची मागणी माजी जिल्हा परिषध सदस्य शालिनीताई विखे पाटील यांची मागणी मान्य करण्यात आलेली आहे.

करोनामुळे जिल्हा परिषदेचे बजेट 30 टक्क्यांनी कमी झालेले असून यामुळे घसारा निधीची 40 लाखांची रक्कम 30 लाखावर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच या पुढे प्रत्येक विभागाने तपशीलनिहाय साडेबारा टक्क्यानुसार घसारा निधी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात किती नुकसान झाले याची माहिती सदस्य घेत असतानाच वन विभागाच्या अधिकार्‍यांनी आपल्याकडे माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने सदस्य आक्रमक झाले.

संगमनेरचे रामहरी कातोरे यांनी आपल्या गटातील शेतकर्‍यांना वनविभागाच्या हद्दीतून जाता येत नसल्याने शेती पडीक पडत असून वनविभागाचे अधिकारी शेतकर्‍यांना त्रास देत आहे. त्यामुळे वनविभागाचे अधिकार्‍यांवर कारवाई करावी, व रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख यांनी वन विभाग दरवर्षी लाखो झाडे लावतात तर ते जातात कोठे असा सवाल केला.

त्यावर उपाध्यक्ष प्रताप शेळके म्हणाले, वन व सामाजिक वनीकरण यांची एकत्र बैठकयांनी त्यामध्ये यावर चर्चा करू. चौदा व वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम किती याची माहिती भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे ायंनी विचारली. तसेच अर्सेनिक अल्बमसाठी किती रक्कम खर्च होणार याची माहिती विचारली.

ग्रामपंचायतींची कामे झेडपी तपासणार

जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या पातळीवर पडून असणारा निधी, दलित वस्तीमध्ये करण्यात आलेली कामे, वीजेची कामे यात मोठा गैरप्रकार झालेला आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने याची चौकशी करून संबंधीत दोषींवर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी सदस्य शरद नवले यांनी केली. त्यावर सीईओ क्षिरसागर यांनी ग्रामपंचायत विभाग आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे ग्रामपंचायतींच्या कामाची तपासणी करती, असे जाहीर केले.

शिक्षक बँकेच्या कपातीबाबत सीईओ निर्णय घेणार

जिल्हा परिषद कर्मचारी स्वत: वेळ आणि साहित्याचा वापर करून जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक आणि वित्तीय संस्थाच्या कर्जाच्या रक्कमेची कपात करून देतात. यात जिल्हा परिषदेला कोणताच मोबदला मिळत नसल्याने याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर हे सर्व बाबी नियम तपासून याबाबत निर्णय घेणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सामान्य प्रशासनाचा निष्काळजीपणा

सभेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचा निष्काळजीपणा पुन्हा समोर आला. सदस्यांना सभेची विषय पत्रिका वेळत न मिळाल्याने अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ऑनलाईन सभेच्यावतीने वारंवार संपर्क तुटत असल्याने सदस्य चिडले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या