Saturday, April 27, 2024
Homeनगरलेखी प्रतिपादन सभेत 37 विषयांना मंजुरी

लेखी प्रतिपादन सभेत 37 विषयांना मंजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेची बहुप्रतिक्षित लेखी प्रतिपादन सर्वसाधारण सभा काल पार पडली. विरोधी सदस्यांनी ही सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची मागणी केली होती, मात्र ती पूर्ण झाली नाही. या सभेत मांडलेले सर्वच्या सर्व

- Advertisement -

37 विषय बहुमताने मंजूर झाले असल्याची माहिती अध्यक्ष यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. दरम्यान, ही सभा होताच झेडपीचे पदाधिकारी आणि अधिकारी अचानक संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे. तसेच झेडपी मुख्यालयात काही अधिकारी व कर्मचार्‍यांना करोना प्रादुर्भाव झालेला आहे. तसेच सभा व्हिडीओ कॉन्फरन्सवर घेण्यास शासनाने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे 27 मे रोजी लेखी प्रतिपादन पद्धतीने सभा घेण्यात आली, तशीच आजची सर्वसाधारण सभा देखील लेखी प्रतिपादन पद्धतीने घेण्यात आली, असे प्रशासनाने नमूद केले आहे.

काल सभेत सर्व विषय मंजूर झाले, ज्यामध्ये झेडपीची निरुपयोगी सामग्री लिलावाने विक्री करणे, बालमटाकळी (शेवगाव) येथे शॉपिंग सेंटर व ग्रामपंचायत कार्यालयासाठी विकास निधीतून कर्ज देणे, बेलवंडी ग्रामपंचायतीचे व्यावसायिक गाळे, कार्यालये, सभागृहासाठी ग्रामविकास निधीतून कर्ज, झेडपी स्तरावर जैविक विविधता व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यास मंजुरी मिळाली.

14 व्या वित्त आयोगाच्या व्याजातून होमिओपॅथिक औषधे, आर्सेनिक अलबम 30 ची तत्काळ खरेदी करणे, संगमनेर, अकोले, नेवासे, शेवगाव, नगर, तालुक्यांत प्राथमिक आरोग्य केंद्र, मुख्य इमारती बांधण्यास मंजुरी मिळाली. कोपरगाव, पारनेरमध्ये चार, श्रीगोंद्यात, नगर, तर कर्जत तालुक्यात तब्बल 42 रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

झेडपीच्या सेस फंडातून कृषी विभागाच्या अखर्चित निधी पुन्हा खर्च करणे, भैरवनाथ व वाघोबा उपसा सिंचन योजनांना मंजुरी मिळाली आहे. दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत 80 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास मंजुरी मिळाली आहे. 50 लाख रुपयांपेक्षा अधिक तरतुदींच्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळाली आहे.

जिल्हा वार्षिक योजनेसाठी मंजूर अनुदानातून बिगर आदिवासी क्षेत्रासाठी औषध साहित्य, लिनन प्रयोगशाळा साहित्य खरेदीला मंजुरी मिळाली आहे. याच योजनेतून प्राथमिक शाळांमध्ये स्वछतागृहे बांधणे, शाळांमध्ये सोलर पॅनल सिस्टीम बसवणे, यासाठी अनुदान मंजुरी मिळाली आहे. तसेच सेस निधीतून महिला बालकल्याण साठी अखर्चित अनुशेष देण्यास मंजुरी दिली आहे.

पशुसंवर्धनची कामे मार्गी लागणार

आगामी आर्थिक वर्षात दुभत्या जनावरांना खाद्यासाठी 66.21 लाख तरतुदीतून खर्चाला मान्यता मिळाली आहे. पशुवैद्यकीय संस्थांसाठी 88 लाख रुपये निधीतून औषध खरेदीला मान्यता मिळाली आहे. झेडपी सेस निधीतून पशुसंवर्धन विभागासाठी मंजूर अनुदानाचे पुनर्वियोजन करण्यास, संसर्गजन्य रोगनिदान व अन्य उपाययोजना करण्यासाठी 58 लाख रुपयांच्या निधीतून काऊ-लिप-टिंग मशीन पुरवठा करण्यास मंजुरी मिळाली आहे.

प्रशासनाचीच सरशी झाली

विकासाच्या कामाला विरोधात नाहीत. पण सभेतील विषयांवर सविस्तर चर्चा होणे गरजेचे असते. मागणी करूनही प्रशासनाने शेवटी लेखी प्रतिपादन पद्धतीनेच सभा घेतली. त्यात अपेक्षेनुरूप सगळेच विषय मान्य झाले. त्याबद्दल सर्व पदाधिकारी यांचे आभार. किमान लेखी प्रतिपादनसाठी तरी सदस्यांना विचारले, अशी उपरोधिक प्रतिक्रिया झेडपी सदस्य राजेश परजणे यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या